बोगस डॉक्टर दाम्पत्याचा रुग्णांच्या जिवाशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 10:20 PM2018-06-08T22:20:50+5:302018-06-08T22:20:50+5:30
एकनाथ पाटील/कोल्हापूर : ताप, थंडी यांवरील उपचारांसह मुलगाच होणार असे ठामपणे सांगून झाडपाल्याच्या औषधासह, इंजेक्शन देण्याबरोबरच गर्भलिंग तपासणीमध्ये निगवे दुमाला (ता. करवीर) येथील बोगस डॉक्टर दाम्पत्य राजरोस रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. यासंबंधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार पुराव्यानिशी दाखल झाली आहे. या ‘हिटलिस्ट’ डॉक्टरांवर कारवाईचा स्कॅनर फिरणार कधी? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
हालोंडी (ता. हातकणंगले) येथील भरत पाटील या बोगस डॉक्टराच्या मुसक्या आवळल्यानंतर जिल्'ातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. काही डॉक्टरांनी पदवीप्रमाणे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे; परंतु तसे न करता ते अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करीत आहेत. या डॉक्टरांना त्यांची पत्नीही मदत करते. स्वघोषित ‘डॉक्टर’ ही पदवी लावून पतीच्या गैरहजेरीत त्या दवाखाना चालवितात.
रुग्णाला तपासण्याबरोबर त्याला इंजेक्शनही देण्याचे धाडस त्या करीत आहेत. ग्रामीण भागातील काही लोक अशिक्षित असून, त्यांच्या अज्ञानाचा फायदा हे बोगस डॉक्टर दाम्पत्य घेत आहे. अशा प्रकारे जिल्'ातील ३० पेक्षा जास्त डॉक्टरांचा संशयास्पद कारभार सुरूअसल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
निगवे दुमाला (ता. करवीर) येथील दत्तात्रय शामराव चौगले यांनी दि. ९ मे रोजी गावातील अशाच एका बोगस डॉक्टर दाम्पत्याविरोधात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
संबंधित डॉक्टराने दवाखान्याबाहेर डॉक्टर पदवीचा फलक लावला आहे. त्याची पत्नी डॉक्टर नसतानाही ती पतीच्या गैरहजेरीत दवाखाना चालविते. ती रुग्णांना इंजेक्शन देतानाची व्हिडीओ क्लिप चौगले यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र, या तक्रारीची दखल आरोग्य प्रशासनाने अद्यापही घेतलेली नाही. याउलट चौगले यांना संबंधित डॉक्टर व त्याचे नातेवाईक, मित्रांकडून अर्ज माघारी घेऊन प्रकरण मिटविण्यासाठीचे फोन केले जात आहेत. गेले महिनाभर तक्रार अर्ज जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे. त्याच्यावर कारवाई सोडा, साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाºयांनी केलेले नाही. प्रशासनच अशा बोगस डॉक्टरांना पाठबळ देत असेल तर रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास प्रशासनही तितकेच जबाबदार राहणार आहे.