बोगस विद्यार्थी नोंद, शाळांची ३ कोटींची वसुली थकीत; राज्यातील २८२ शाळांवर कारवाईचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 11:55 AM2022-02-11T11:55:40+5:302022-02-11T11:57:02+5:30
राज्यात ३ ते ५ आक्टोबर २०११ मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबवण्यात आली होती.
समीर देशपांडे
कोल्हापूर : राज्यामध्ये २०११ मध्ये घेण्यात आलेल्या विशेष पटपडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या खासगी, जि. प. प्राथमिक शाळांकडून चार कोटी १४ लाख रुपयांची वसुली लावण्यात आली होती. परंतु दहा वर्षे झाली तरी त्यातील केवळ १ कोटी १५ लाख रुपये वसूल झाले आहेत. उर्वरित सुमारे ३ कोटी रुपयांची वसुली लावण्यात आली आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांतील २८२ शाळांवर याबाबत कारवाई करण्याचा इशारा एका परिपत्रकानुसार देण्यात आला आहे.
राज्यात ३ ते ५ आक्टोबर २०११ मध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबवण्यात आली होती. यामध्ये राज्यातील ४०० हून अधिक शाळांमध्ये प्रत्यक्षात पट कमी असून त्याठिकाणी जादा पट दाखवल्याचे निष्पन्न झाले होते. या बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षकांच्या पदांमध्ये वाढ करवून घेऊन तसेच शिष्यवृत्ती आणि ईबीसी सवलतीच्या माध्यमातून कोट्यवधीचा गैरकारभार केल्याचे आढळून आले होते.
अशा विद्यार्थी संख्या बोगस दाखवणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करावी, यासाठी ब्रिजमोहन मिश्रा यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. यावेळी यातील दोषी शाळांकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते.
परंतु ही वसुली न झाल्याने मिश्रा यांनी पुन्हा दोनवेळा न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली होती. त्यामुळे येत्या चार दिवसांत या शाळांकडून २ कोटी ९८ लाख ७६ हजार रुपये वसूल करावेत, असे परिपत्रक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी २२ जिल्ह्यांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना ९ फेब्रुवारी २२ रोजी काढले आहे.
या शाळा जर ही रक्कम भरणार नसतील तर त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई करून अहवाल देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
जिल्हा दोषी शाळा वसूल रक्कम
ठाणे ०७ ९,११,२८९
रायगड १२ १०,४९,२२५
धुळे १२ ९७,५०,९७३
जळगाव ११ १,७२,८०५
पुणे ०१ ८,७७,३२२
सोलापूर ६९ ७८,३४,६८५
औरंगाबाद ०० ६५,५१६
जालना ०८ ४०,१८४
बीड १४ १०,७८,१५०
परभणी ११ ४,५०,७२८
हिंगोली ०२ ८५,८०७
लातूर २३ ७,०२,४१३
नांदेड २४ ५,७९,०३३
उस्मानाबाद ०८ ५,९२,२७६
नागपूर २५ १,११,३८७
वर्धा ०१ ७१,८८०
भंडारा ०६ ३,१६,०३१
गोंदिया १३ ३६,७६,०००
अमरावती ०६ ७,८६,९४१
अकोला ०४ २,२९,६२२
वाशिम ०७ ३,७७,५००
बुलडाणा ०५ १,१६,३१६
एकूण २८२ २,९८,७६,०८३