बोगस ‘टीडीआर’प्रकरणी मोजणी नकाशा अखेर रद्द
By admin | Published: August 4, 2015 12:43 AM2015-08-04T00:43:04+5:302015-08-04T00:43:04+5:30
भूपाल शेटे : चुकीची मोजणी करणाऱ्यांवर कारवाई करा
कोल्हापूर : महानगरपालिकेत गाजत असलेल्या बोगस टीडीआर प्रकरणातील मोजणी नकाशा अखेर करवीर भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांनी रद्द केला. त्यामुळे पैसे फेकले की काहीही करता येऊ शकते, या प्रवृत्तीला चांगलाच चाप बसल्याची माहिती नगरसेवक भूपाल शेटे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील ज्या कर्मचारी, अधिकाऱ्यांनी चुकीची मोजणी करून फसवणूक करण्याच्या इराद्याने नकाशा दिला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पुणे जमाबंदी आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेटे यांनी सांगितले की, राधानगरी रोडवरील रि.स.नं. १०१०/१अ या क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेचा खोटी कागदपत्रे सादर करून त्या जागेचा घेतला जाणारा दोन लाख स्क्वेअर फुटाचा टीडीआर आयुक्तांनी स्थगित केला होता. परंतु, त्यानंतर मनपा अधिकारी व बांधकाम व्यावसायिक धैर्यशील यादव यांनी दुसऱ्याच एका तीन गुंठे जमिनीची ९९ हजार स्क्वेअर फूट जागा असल्याचे भासवून टीडीआर घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याची माहिती मिळताच आपण लेखी तक्रार करून संबंधितांना सावध केले होते. त्यामुळे त्याची चौकशी करून भूमी अभिलेख उपअधीक्षकांनी मोजणी नकाशाच रद्द केला.
ज्यांनी चुकीचा मोजणी नकाशा तयार करून दिला, त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जमाबंदी आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. तसेच ३० वर्षांचा सर्च रिपोर्ट पाहून ही जमीन फ्री होल्ड आहे, असा अभिप्राय देणाऱ्या मनपा वकील प्रशांत चिटणीस यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शेटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
प्रक्रिया थांबवली
यादव यांनी १६ फेब्रुवारीला मोजणीची मागणी केली होती, त्यानुसार १० एप्रिलला जागेची मोजणी करण्यात आली होती. परंतु, नंतर ०.९९ आर. क्षेत्रावर यादव यांचे नाव नसल्याचे ७/१२ पत्रकी आढळून आले. त्यामुळे १५ दिवसांत सुधारित ७/१२ उतारा सादर करण्यात यावा, म्हणून उपअधीक्षक पल्लवी शिरकाळे यांनी नोटीस दिली होती. तरीही त्यांनी तो दिला नाही. म्हणून मोजणी नकाशा २७ जुलैला रद्द करण्यात आला. त्यामुळे आता ही बोगस प्रक्रियाही थांबवावी लागेल, असे शेटे यांनी सांगितले.