बॉयलर पेटले, साखर कारखान्यांची लगबग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:32 AM2018-10-19T11:32:37+5:302018-10-19T11:34:14+5:30
बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.
कोल्हापूर : बॉयलर पेटल्याने साखर कारखाना प्रशासनाची लगबग वाढली आहे. आगामी हंगाम सुरू करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असली, तरी ऊसदराचा तिढा कसा व कधी सुटतो, यावरच हंगामाचे गणित अवलंबून राहणार आहे. यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र जरी वाढले असले, तरी एकसारखा झालेला पाऊस व त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने उत्पादनात घट येईल, असा साखर कारखानदारांचा अंदाज आहे.
राज्य सरकारने यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास २० आॅक्टोबरपासून परवानगी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे कारखाना प्रशासनाने गाळप हंगामाची तयारी केली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहेत. आता प्रत्यक्ष हंगाम सुरू होण्याची प्रतीक्षा असून, यंत्रणा सज्ज झाली आहे.
सरकारने जरी २० आॅक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास मान्यता दिली असली, तरी ऊसदराचा तिढा सुटत नाही तोपर्यंत हंगामाला गती येणार नाही. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना ऊसदराचा मुद्दा ताणणार हे निश्चित आहे.
एकरकमी एफआरपी हीच पहिली उचल, अशी कारखानदारांची मानसिकता दिसते; पण गेल्या वर्षीप्रमाणे एफआरपी अधिक ३00 -४00 रुपये मिळतात का? यासाठी संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. कारखाना प्रशासन जरी सज्ज झाले असले, तरी सगळ्यांच्या नजरा ऊसदर आंदोलनाकडे लागल्या आहेत. दराचा तिढा सुटल्याशिवाय हंगामाला वेग येणार नाही, हे निश्चित आहे.
जिल्ह्यात या हंगामात १ कोटी ३८ लाख टन ऊस गाळपाचा अंदाज आहे. उसाचे क्षेत्र वाढले, तरी उसाच्या उत्पादनात फारशी वाढ होणार नाही, असा अंदाज साखर कारखान्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. गेल्या हंगामात १ कोटी ३३ लाख टन उसाचे गाळप झाले होते. यंदा सलग पडलेला पाऊस आणि त्यानंतर त्याने दिलेल्या हुलकावणीने ऊसवाढीवर परिणाम झाला आहे.