कासारी खोऱ्यात कोरोना लसीकरणाचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:00+5:302021-04-20T04:24:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अणूस्कुरा : कासारी खोऱ्यात ‘इंटरनेट सुविधा गायब, कोरोना लसीकरणाचा बोजवारा’. मागील दोन आठवड्यापासून दक्षिण शाहूवाडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अणूस्कुरा : कासारी खोऱ्यात ‘इंटरनेट सुविधा गायब, कोरोना लसीकरणाचा बोजवारा’.
मागील दोन आठवड्यापासून दक्षिण शाहूवाडी परिसरामध्ये एकमेव सुरू असलेल्या बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क गायब झाल्याने या दुर्गम भागातील सर्व ऑनलाईन कामकाज ठप्प झाले आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण खोळंबले आहे.
इंटरनेट सुविधा नसल्याने लसीकरणासाठी आवश्यक असलेले रजिस्ट्रेशन होत नसल्याने लसीकरण करता येत नाही,त्यामुळे परिसरातील वयोवृद्ध माता-भगिनींना प्राथमिक आरोग्य केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या परिसरातील माळापुडे ते गजापूर दरम्यान फक्त बीएसएनएल नेटवर्क उपलब्ध असते,परंतु त्यातही सातत्य नसते, शेत नांगरट, रस्ता दुरुस्ती यामुळे सतत केबल तुटणे यासारखे प्रकार सुरू असतात. तसेच वीज खंडित झाल्यानंतर लगेचच मोबाईल नेटवर्क बंद पडते.
ऑनलाईन अभ्यास बंद
शालेय विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास पूर्णपणे बंद आहे तसेच वर्क फ्रॉम होम करणारे कार्यालयीन कर्मचारी यांचेही काम बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे,ज्येष्ठ नागरिक,शेतकरी यांचे अनेक प्रकारचे दाखले, वीज बिल भरणा,अनेक प्रकारचे रिचार्ज ही कामे थांबली आहेत. साधा ऑनलाईन अर्ज जरी भरायचा असेल तर दूर पस्तीस ते चाळीस कि.मी.अंतरावर जावे लागते. परंतु टाळेबंदी असल्याने कोठेही बाहेर पडता येत नाही, सामान्य नागरिकांना यामुळे खूपच मानसिक त्रास होत आहे.