गोकाकजवळ बोलेरोला अपघात; सहा महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:18 AM2018-12-05T00:18:08+5:302018-12-05T00:18:12+5:30
बेळगाव : ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून बोलेरो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या. ...
बेळगाव : ऊस भरून थांबलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून बोलेरो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या. तर दहाजण जखमी झालेत. मंगळवारी पहाटे गोकाक तालुक्यातील हिरेनंदीजवळ हा अपघात झाला. सर्व मृत सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरझरवी येथील रहिवासी असून ते गोकाक फॉल्स येथे नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून परत येत होते.
मृतांमध्ये गंगव्वा हुरळी (वय ३०), काशवा खंडरी (७०), यल्लव्वा पुजारी (४५), यल्लव्वा गुंडाप्पानवर (४०), रेणुका सोपडला (३४) व मल्लव्वा खंडरी (५०) यांचा समावेश आहे. माडमगेरी आणि यरझरवी येथील पंधराजण बोलेरोमधून गोकाक फॉल्स येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. अंत्यविधी आटोपून सोमवारी मध्यरात्री ते गावी परत येत होते. पहाटेच्या सुमारास हिरेनंदी येथे बंद पडलेल्या उसाच्या ट्रॅक्टरला भरधाव बोलेरोची पाठीमागून जोरदार धडक बसली. अंधारामुळे बोलेरो चालकाला ट्रॅक्टर दिसला नाही. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला आहे. या धडकेत मध्ये मोटारीतील चार महिला जागीच ठार झाल्या. उर्वरित दोघींचा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याशिवाय या घटनेत दहाजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची गोकाक पोलिसांत नोंद झाली आहे.