कोल्हापूर रेल्वेस्थानकात 'बॉम्ब', यंत्रणा हादरली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 10:22 PM2023-08-09T22:22:00+5:302023-08-09T22:22:19+5:30

आधी प्रवाशांची घाबरगुंडी नंतर कळला हा तर ‘मॉकड्रिल’चा प्रकार, यंत्रणांची रंगीत तालिम, गर्दीच्या ठिकाणांचीही तपासणी

'Bomb' in Kolhapur railway station, system shook! | कोल्हापूर रेल्वेस्थानकात 'बॉम्ब', यंत्रणा हादरली!

कोल्हापूर रेल्वेस्थानकात 'बॉम्ब', यंत्रणा हादरली!

googlenewsNext

कोल्हापूर : बुधवारी (दि. ९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास शहरातील विविध आपत्कालीन यंत्रणांच्या कार्यालयातील फोन खणखणले आणि रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा संदेश मिळाला. पुढील २० ते २५ मिनिटांत यंत्रणा रेल्वे स्थानकात पोहोचल्या. अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर संशयास्पद वस्तूंचा शोध घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात यंत्रणांना यश आले. अखेर हे मॉकड्रील असल्याचे समजल्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आगामी स्वातंत्र्य दिन, दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मॉक ड्रील करण्याच्या सूचना शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शहरातील सर्व पोलिस, ठाणी, अग्निशमन दल, शीघ्र कृती दल, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका अशा विविध यंत्रणांना फोनद्वारे संदेश दिला. 

रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू असून, तातडीने घटनास्थळी हजर होण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पुढील २० ते २५ मिनिटांत सर्व आपत्कालीन आणि सुरक्षा यंत्रणा सायरन वाजवत रेल्वे स्टेशनसमोर पोहोचल्या. शहर उपअधीक्षक अजित टिके यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तातडीने परिसरातील गर्दी हटवून संशयास्पद वस्तूंचा शोध सुरू केला.

सुमारे ३० मिनिटांच्या शोध मोहिमेनंतर बॉम्ब शोधक पथकाला स्टेशन परिसरात दोन संशयास्पद बॅग मिळाल्या. सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यातील बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले. अखेर हे मॉकड्रील असल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, सतीशकुमार गुरव, अजयकुमार सिंदकर, नंदकुमार मोरे, अनिल तनपुरे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते

Web Title: 'Bomb' in Kolhapur railway station, system shook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.