कोल्हापूर विमानतळावर बॉम्बची धमकी, पोलिसांची सुरक्षेसाठी कवायत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:18 PM2024-12-03T12:18:15+5:302024-12-03T12:19:11+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळताच बॉम्ब डिटेक्शन आणि ...

Bomb threat at Kolhapur airport, police drill for security | कोल्हापूर विमानतळावर बॉम्बची धमकी, पोलिसांची सुरक्षेसाठी कवायत

कोल्हापूर विमानतळावर बॉम्बची धमकी, पोलिसांची सुरक्षेसाठी कवायत

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावर बॉम्ब असल्याची सूचना सोमवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळताच बॉम्ब डिटेक्शन आणि डिस्पोजल स्क्वाडच्या जवानांनी केवळ पंधरा मिनिटांतच विमानतळाच्या ३९०० चौरस मीटरमधील इमारतीत तसेच कानाकोपऱ्यामध्ये शोध घेत पुढील पंधरा मिनिटांमध्ये संबंधित बॉम्ब निष्प्रभ केला. ही काही प्रत्यक्षात घडलेली घटना नव्हती, तो एक कवायतीचा भाग होता.

बॉम्बची धमकी देऊन विघातक कारवाईची शक्यता विमान सेवेमध्ये येऊ शकते. अशा प्रसंगास तोंड देण्यासाठी सोमवारी ही नागरी विमान उड्डाण सुरक्षा ब्युरो यांच्या निर्देशानुसार वार्षिक कवायत पार पडली. यात कोल्हापूर पोलिसांचे विमानतळ सुरक्षा पथक आणि बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वाडसह अन्य पोलिस दल, कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच इंटेलिजन्स ब्युरो आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विमान वाहतूक नियंत्रण, संचार विभाग, अग्निशमन दल आणि सुरक्षा अधिकारी यांनी भाग घेतला. 

बॉम्बची धमकी मिळताच इमारतीच्या आतमधील सर्व उपस्थितांना सुरक्षित असेंब्ली पॉईंट्सकडे जाण्याची सूचना देण्यात आली. सेक्युरिटी होल्डमधील लोकांना एअरसाईड अर्थात विमाने उभी राहतात त्या दूर अंतरावर एक असेंब्ली पॉईंट आणि इतरांसाठी विमानतळाबाहेरील दुसऱ्या असेंब्ली पॉईंटजवळ निर्देश फलक लावले आहेत. विमानतळ पोलिस सुरक्षा दलाच्या प्रमुख स्नेहा गिरी यांनी कंट्रोल रूमशी समन्वय ठेवला. धमकी देणाऱ्या मोबाईल नंबरचा पत्ता सायबर सेलने काही मिनिटांतच काढला. त्याचे लोकेशनही शोधून काढले आणि त्या व्यक्तीपर्यंत विनाविलंब पोहोचण्याचीही कार्यवाही कोल्हापूर पोलिसांनी केली. 

अशा प्रकारची खोटी धमकी दिल्यास एफआयआर दाखल करून त्या व्यक्तीविरुद्ध खटला भरण्याचे आदेश बीसीएएस मार्फत दिले गेले. कवायतीत करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर, बीडीडीएसचे चौगुले, डॉग सिंबा आणि पथक, कमांडो फोर्सचे निकम आणि पथक, दहशतवाद विरोधी पथकाचे बाबर आदी अधिकारी सहभागी झाले. विमानतळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी जितेंद्र पचौरी यांनी कवायतीचे संचलन केले.

Web Title: Bomb threat at Kolhapur airport, police drill for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.