महापालिकेत फुटणार सत्तांतराचा बॉम्ब?
By admin | Published: November 2, 2014 11:47 PM2014-11-02T23:47:56+5:302014-11-02T23:53:44+5:30
सावध घडामोडी : राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेना, भाजप व अपक्ष नगरसेवकांची मोट बांधण्याच्या हालचाली
संतोष पाटील- कोल्हापूर -थेट पाईपलाईन कोरडीच निघाल्याने ‘काही’ नगरसेवकांत असलेली नाराजी, विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल, जिल्ह्यात ‘बॅकफुट’वर गेलेली काँग्रेस-राष्ट्रवादी, कारभारी नगरसेवकांची ‘दक्षिण’ विधानसभा निवडणुकीतील भूमिका, राज्यातील सत्तेमुळे भाजप व शिवसेनेचे वाढलेले बळ आदी कारणांनी महापालिकेत येत्या काही महिन्यांत मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-भाजपसह तिसऱ्या आघाडीतील नगरसेवकांची संख्या २५च्यावर गेल्याने राष्ट्रवादीच्या संमतीने काँग्रेसमधील नाराजांच्या साथीने महापालिकेत सत्तांतराचा ‘बॉम्ब’ फोडण्याची तयारी सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीत पडद्यामागे मोठ्या हालचाली घडल्याचे किस्से आता समोर येऊ लागले आहेत. महापालिकेची सत्तासूत्रे हातात असलेल्या माजी मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील या दोघांसाठी निवडणुकीचा निकाल अस्तित्वावर परिणाम करणारा असाच आहे. पक्षीय राजकारणाला साद देत नगरसेवकांनीही कागल, करवीर, दक्षिण व उत्तरमध्ये सोयीची भूमिका घेतली. विधानसभेची हद्द संपली की नगरसेवकांची टोपी बदलत होती. निवडणुकीत नगरसेवकांनी घेतलेली सोयीची भूमिका आता महापालिकेत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरत आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा झेंडा घेतला. त्यामानाने दक्षिणेत सर्वच नगरसेवक राबताना दिसले नाहीत. याउलट ‘दक्षिण’मध्ये सतेज पाटील यांच्यासाठी प्रचाराचा जोर लावलेले नगरसेवक पक्षासाठी शहरात फिरताना दिसले नाहीत. पडद्याआडून जोरदार सूत्रे हलवत सर्वच नगरसेवकांनी सोयीनुसार भूमिका घेत, राजकीय वचपा काढण्याचेच धोरण विधानसभेच्या रणांगणात स्वीकारले होते.
नगरसेवक प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव, नगरसेविका मृदुला पुरेकर यांनी ‘उत्तरे’त राष्ट्रवादीच्या बाजूने, तर ‘दक्षिणे’त सतेज पाटील यांच्या विरोधात जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. जनसुराज्य आघाडीच्या नऊ सदस्यांनी उत्तर-दक्षिणमध्ये पक्षाच्या टोप्या बदलतकसरत केली. यामागे पाईपलाईनच्या राजकारणाचा मोठा भाग होता. आता पाईपलाईनचा मुद्दा पुढे करून नगरसेवकांची वेगळी मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानिमित्त कोरडी गेलेली पाईपलाईन हात ओले करेल, अशी अनेकांना आशा आहे.
पक्षीय बलाबल
पक्ष संख्याबळअपक्षांचा पाठिंबाएकूण
काँग्रेस३१०२३३
राष्ट्रवादी२५०१२६
शिवसेना-भाजप आघाडी०७०२०९
जनसुराज्य आघाडी०४०५०९
एकू ण ७७
स्वीकृत ०५
चार वर्षे लक्ष्मीदर्शन नाही
गेली चार वर्षे नगरसेवकांना लक्ष्मीदर्शन झालेले नाही. नेत्यांनी सर्वच मोठ्या योजनांमध्ये थेट हस्तक्षेप केल्याने नगरसेवकांना हक्काच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागल्याची भावना बळावत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात थेट पाईपलाईनसारख्या मुद्द्यावरून जोरदार हालचाली करून किमान येणारी निवडणूक सुसह्य करण्याची अनेकांनी मानसिकता केली आहे.
सत्तांतराचा बॉम्ब
प्रा. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप, जनसुराज्य व अपक्ष असे मिळून २५ नगरसेवकांनी विरोधाची मोट बांधली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जयंत पाटील यांना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादीच्या संमतीने व काँग्रेसमधील नाराजांना सोबत घेऊन पुढे महापालिकेत सत्तांत्तर घडविण्याच्या हालचाली आहेत.
नगरसेवकांची भीती
दहा महिन्यांनंतर होणारी महापालिकेची निवडणूक पुन्हा शिवसेना व भाजप जोमाने लढविणार यात शंकाच नाही. या निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसने खातेही उघडलेले नाही, तर राष्ट्रवादी सत्तेबाहेर गेल्याने नेत्यांसह पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. नेत्यांचा पूर्वीसारखा आब राहिलेला नाही. त्यामुळे एकवेळ अपक्ष लढू मात्र काँगे्रस किंवा राष्ट्रवादीची उमेदवारी नको, अशी अनेक नगरसेवकांची मानसिकता झाली आहे. भाजपचे वावडे असणाऱ्यांसाठी काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी ताराराणी आघाडीचा तिसरा
पर्याय खुला ठेवण्यात येणार आहे. त्याची पायाभरणी आतापासूनच सुरू आहे.