रशियन अभ्यासक्रमाद्वारे शिवाजी विद्यापीठाशी बंध दृढ :द्मीत्री सकलोव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 10:46 AM2019-09-10T10:46:53+5:302019-09-10T10:49:13+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग हा भारत व रशिया यांच्यातील सांस्कृतिक बंध आहे. रशियन भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग हा भारत व रशिया यांच्यातील सांस्कृतिक बंध आहे. रशियन भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा बंध अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन रशियातील मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. द्मीत्री सकलोव यांनी येथे केले.
विदेशी भाषा विभागातील रशियन भाषेच्या विद्यार्थ्यांशी ‘मुक्त संवाद’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. मागार्रिता रेमीजवा उपस्थित होत्या. या कार्यक्रमात रशियातील दैनंदिन जीवन, पाककला, कुटुंब व विवाहपद्धती यासंदर्भातील अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. द्मीत्री सकलोव यांनी दिलखुलास उत्तरे दिली. त्यांनी खास रशियातून सोबत आणलेले ‘मत्र्योश्का’ही लाकडी बाहुली, काळा पाव आणि कॅव्हिअर या पदार्थांची ओळख त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली. त्याचबरोबर सोविएत व उत्तर-सोव्हिएत काळातील जीवनशैलीमधील फरक स्पष्ट केला.
रशियन लोकांना भारतातील निसर्ग अतिशय प्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मागार्रीता रेमीजवा म्हणाल्या, रशियन स्त्रीने जीवनाच्या सर्व क्षेत्रात आज स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ही स्त्री हे एक अतिशय कणखर व स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहयोगी शिक्षिका शीतल कुलकर्णी, प्रियांका माळकर उपस्थित होत्या.