बोचऱ्या वाऱ्याने अंगाला हुडहुडी!

By admin | Published: October 27, 2014 12:20 AM2014-10-27T00:20:04+5:302014-10-27T00:26:06+5:30

पावसाची भुरभुर : ढगाळ वातावरणामुळे निरुत्साह; जिल्ह्यात सरासरी ३३.०१ मिलिमीटर पाऊस

Booby wind | बोचऱ्या वाऱ्याने अंगाला हुडहुडी!

बोचऱ्या वाऱ्याने अंगाला हुडहुडी!

Next

कोल्हापूर : रात्रभर पावसाच्या सरी, सकाळपासून अंगाला झोंबणारा वारा व पुन्हा पावसाची भुरभुर असे ढगाळ , निरुत्साही वातावरण कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर राहिले. दिवसभर हुडहुडी भरविणाऱ्या थंडीने आबालवृद्ध अक्षरश: आकसून गेले होते. स्वेटर, कानटोपीने पूर्ण अंग झाकून घेऊनच नागरिक बाहेर पडत होते. अंग गारठविणारा वारा, त्यात खराब वातावरणासह पावसाची भुरभुर दिवसभर सुरू होती.अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने जिल्ह्यात गेले दोन दिवस पाऊस सुरू आहे. काल, शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस कोसळला. पावसाबरोबर हवेत कमालीचा गारठा आहे. अंगाला झोंबणारा वारा दिवसभर वाहत असल्याने अंग अक्षरश: गारठून जात आहे. आज रविवार असल्याने कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच गोची झाली होती. खराब हवामानामुळे सर्वत्र निरुत्साही वातावरण होते. गाडीवरून जाताना विशेषत: लहान मुलांना त्रास जाणवत होता. दिवसभर हुडहुडी राहिल्याने त्याचा परिणाम कामकाजावर झाला.
आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३३.०१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावडा वगळता सर्वच तालुक्यांत रात्री दमदार पाऊस झाला. या पावसाने काढणीस आलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रोपलागणीचे भात, ज्वारी अडकली आहे. अनेक ठिकाणी भातपिके भुईसपाट झाली असून, भाताच्या लोंब्या पाण्यात पडल्याने त्यांना मोड येत आहेत, तर मळणी करून घरात आणून ठेवलेले भात सुकवायचे कोठे असा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर आहे. गुऱ्हाळघरांवरही पावसाचा परिणाम झाला असून, जळण भिजल्याने गुऱ्हाळघरे बंद आहेत. खराब हवामानाचा गुळाच्या प्रतीवर परिणाम होत असल्याने गाळप करण्याचे धाडसही शेतकरी करीत नाहीत.
या पावसाचा खरीप पिकांना फटका बसला असला तरी ऊस, रब्बी पिकांसाठी तो पोषक ठरत आहे. साखर कारखान्यांच्या हंगामाला अजून महिना असल्याने उसासाठी पाऊस पोषक ठरत आहे. माळरानावरील भुईमूग, भात काढणीनंतर पेरलेल्या ज्वारी, हरभरा पिकांना दिलासा देणारा पाऊस आहे.

चोवीस तासांतला पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
करवीर - २६.८९, कागल - ३१.५७, पन्हाळा - २४.४२, शाहूवाडी - १७, हातकणंगले - २२.५७, शिरोळ - २३.२८, राधानगरी - २२.६७, गगनबावडा - ४.५०, भुदरगड - ५४.४०, गडहिंग्लज - ५०.५७, आजरा - ५४, चंदगड - ६४.५०.

गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसाला कमालीचा गारठा असून, रविवारी दिवसभर अंगात हुडहुडी भरविणारा बोचरा वारा असल्याने घराबाहेर पडणे मुश्कील झाले. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पंचगंगा घाटावरून टिपलेले छायाचित्र.

Web Title: Booby wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.