महापुरात बुडाली कोट्यवधींची औषधे -: १४३ विक्रेत्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:46 AM2019-08-23T00:46:07+5:302019-08-23T00:48:11+5:30
नुकसान झालेल्या घाऊक आणि किरकोळ औषधे विक्रेत्यांपैकी अवघ्या २० टक्के जणांचा विमा आहे. उर्वरित विक्रेते असोसिएशन आणि शासनाकडून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
संतोष मिठारी, नसीर अत्तार -
कोल्हापूर : जीवरक्षक ठरणारी, कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रकारची सुमारे नऊ कोटी रुपयांची औषधे महापुरात बुडाली. या महाप्रलयाचा एकूण १४३ औषधे विक्रेत्यांना फटका बसला आहे. त्यांच्या दुकानांमधील फर्निचर, संगणक, औषधांचा साठा आणि विक्रीची नोंद असणारी कागदपत्रे खराब झाली आहेत. नुकसान झालेल्या घाऊक आणि किरकोळ औषधे विक्रेत्यांपैकी अवघ्या २० टक्के जणांचा विमा आहे. उर्वरित विक्रेते असोसिएशन आणि शासनाकडून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
कोल्हापुरातील घाऊक आणि किरकोळ औषधविक्रीचे हब म्हणून शाहूपुरीची ओळख आहे. येथून कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये औषधांचे वितरण होते. शाहूपुरीतील दुसरी, तिसरी, पाचवी, सहावी गल्ली, व्हीनस कॉर्नर, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ आणि दुधाळी परिसरातील दुकानांना महापुराचा फटका बसला. त्यांतील अनेक दुकाने दहा दिवस पुराच्या पाण्यात होती.
कुरुंदवाडमधील २७, कोवाडमधील १०, तर बाजारभोगाव, कळे तर्फ कळंबे येथील प्रत्येकी चार दुकाने पूर्णत: पाण्यात बुडाली. शहरातील घाऊक औषधे विक्रेत्यांच्या अकरा दुकानांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.
सन २००५ च्या महापुराचे आलेल्या पाण्याचा अंदाज घेऊन काहींनी औषधे उंचावर ठेवली, साहित्य हलविले; मात्र, एका रात्रीत पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने तीदेखील औषधे, साहित्य पाण्यात बुडाले. दुकानांमधील फर्निचर, फ्रिज, एसी, संगणक, औषधांचा साठा आणि विक्रीची नोंद असणारी कागदपत्रे भिजल्याने खराब झाली आहेत.
दुकान, गोडावूनच्या तळघरात ठेवलेला औषधांचा साठा, तर पूर्णपणे वाया गेला आहे. पुराचे पाणी ओसरून आठवडा होत आला, तरी अद्याप बहुतांश दुकानांमध्ये भिजलेली औषधे एकत्रित करणे, खराब झालेले फर्निचर, कपाटे बाहेर काढणे, साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. आणखी चार दिवस तरी हे काम सुरू राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.
महापुरामुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे लवकर करून त्याबाबतचे पत्र तातडीने मिळावे, अशी आग्रही मागणी या विक्रेत्यांमधून होत आहे. नुकसान झालेल्या विक्रेत्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा केमिस्टस असोसिएशनकडून सर्वेक्षण सुरू आहे. असोसिएशनचे पदाधिकारी प्रत्येक दुकानामध्ये जाऊन तेथील नुकसानीची माहिती जाणून घेत आहेत.
खराब औषधे नष्ट करण्यात अडचण
भिजलेली औषधे पुन्हा वापरता येत नाहीत. कचºयामध्येही टाकता येत नाहीत. ही औषधे नष्ट करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीचे पत्र घ्यावे लागते. त्यानंतर बायोवेस्ट करणाºया कंपनीकडे ती द्यावी लागतात. मात्र, पंचनामे करण्याची प्रक्रिया अपेक्षित वेगाने होत नसल्याने खराब झालेली औषधे नष्ट करण्यात अडचणी येत असल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. विविध औषधांच्या कंपन्यांचे मुंबई, पुणे, भिवंडी येथे डेपो आहेत. तेथून कोल्हापूरमधील विक्रेत्यांना औषधे पुरविण्यात येतात. काही विक्रेत्यांनी खराब झालेली औषधे कंपनीला परत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
असोसिएशन देणार मदतीचा हात : शेटे
या महापुराच्या कालावधीत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांच्या छावण्या आणि गावांमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांसाठी महाराष्ट्र केमिस्टस असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा केमिस्टस असोसिएशनने विविध संस्थांच्या माध्यमातून सुमारे ४० लाखांची औषधे विनामूल्य दिली. गरजूंसाठी शहरातील केमिस्टस भवनमधून औषधांचे वितरण सुरू असल्याचे जिल्हा केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरुवारी सांगितले. जिल्ह्यातील १४३ औषध विक्रेत्यांचे सुमारे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पूरबाधित दुकानांचे सर्वेक्षण आम्ही करीत आहोत. विम्याची रक्कम अथवा सरकारकडून जाहीर झालेली मदत मिळेपर्यंत या विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रिज आणि ५० हजार ते एक लाख रुपयांची मदत असोसिएशनद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी सभासदांकडून वर्गणी जमा करण्यात येत आहे. सरकारने पंचनाम्याची प्रक्रिया लवकर करून जाहीर केलेली मदत तातडीने द्यावी. ज्या विक्रेत्यांचा विमा नाही, त्यांना नुकसानीची पूर्ण रक्कम मदत म्हणून द्यावी.
तुटवडा जाणवल्यास असोसिएशनशी संपर्क साधा
पूरपरिस्थितीमुळे औषधांचा तुटवडा होईल, असे समजून लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. पुरामुळे जिल्ह्यातील १४३ दुकाने बाधित झाली आहेत. या परिस्थितीतही जिल्ह्यातील इतर औषध दुकानांमध्ये औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तरीदेखील कोणाला औषधांचा तुटवडा जाणवला, तर त्यांनी जिल्हा केमिस्टस असोसिएशनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.