ग्रंथ हे संस्कारांचे माध्यम

By admin | Published: January 28, 2016 11:46 PM2016-01-28T23:46:36+5:302016-01-29T00:36:17+5:30

जयसिंगराव पवार : ग्रंथदिंडीने ‘ग्रंथोत्सव २०१५’ला सुरुवात; मान्यवरांची उपस्थिती

The book is the medium of samskaras | ग्रंथ हे संस्कारांचे माध्यम

ग्रंथ हे संस्कारांचे माध्यम

Next

कोल्हापूर : आपल्या जीवनात आई हे संस्काराचे पहिले, शिक्षक हे दुसरे, तर ग्रंथ हे तिसरे माध्यम आहे. या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू पडत जातात. घरात ग्रंथ असणे हे संस्कृतीचे लक्षण असते. ग्रंथापासून दूर म्हणजे संस्कारापासून दूर असण्यासारखे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनी केले.
शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कोल्हापूर यांच्यातर्फे ‘कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव २०१५’चे गुरुवारी राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, समाजकल्याण विभागाचे सभापती किरण कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, नगरसेवक अशोक जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम, जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप, आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने ग्रंथोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर शाहीर आझाद नायकवडी व सहकाऱ्यांनी पोवाडा सादर केला.
डॉ. पवार म्हणाले, समाजात ग्रंथाची होत असलेली उपेक्षा पाहून अंत:करणाला वेदना होतात. साहित्याची आवड निर्माण व्हावी, म्हणून शासनपातळीवरून प्रयत्न होतात ही चांगली बाब आहे; परंतु प्रत्येक पालकाने, शिक्षकाने आणि स्वत: मुलांनी वाचनाची आवड जोपासायला हवी. मुलांच्या हातात हजारो रुपयांचा मोबाईल देताना आपण त्यांना घडवतोय की बिघडवतोय, याचा विचार पालकांनी करायला हवा. तरुणांनी तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन वाचनाकडे दुर्लक्ष करू नये. ग्रंथविषयक प्रेम निर्माण करण्यास प्राध्यापक, शिक्षकांनी प्रयत्न करावेत.
उद्घाटनापूर्वी सकाळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरून शाहू स्मारक भवन, अशी ग्रंथदिंडी काढण्यात आली. महापौर अश्विनी रामाणे व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. यावेळी काढण्यात आलेल्या दिंडीत १५ शाळांतील सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. करवीर प्रशाला, विक्रमनगरचे झांजपथक दिंडीचे प्रमुख आकर्षण होते. यावेळी साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कर्मचारी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ग्रंथोत्सवानिमित्त शाहू स्मारक भवन परिसरात सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.


ग्रंथसंपदेची पालखी
ग्रंथदिंडीसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीत ‘ज्ञानेश्वरी’, ‘भारतीय संविधान’, ‘श्यामची आई’, ‘अग्निपंख’, ‘राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र’, ‘माती पंख आणि आकाश’ ही ग्रंथसंपदा ठेवण्यात आली होती.
...तरच समाज सुधारेल
मुले-मुली वर्षभरात जितके पैसे कपड्यांवर खर्च करतात, त्यापैकी एका कपड्याचा खर्च वाचवून त्याची पुस्तके विकत घ्यायला हवीत. त्यासाठी मुलांनी पुढाकार घेऊन पालकांकडे अशी मागणी करायला हवी, तरच हा समाज सुसंस्कृत होईल, असे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले.

आॅनलाईन युगातही ग्रंथ प्रभावी
कोल्हापूर : सध्या उपलब्ध असलेले इंटरनेट युगातील माहिती मिळविण्याचे मार्ग, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे, आॅनलाईन पुस्तकांपेक्षा मुद्रित ग्रंथ हेच वाचनाचे व माहिती मिळविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा सूर ग्रंथोत्सवातील परिसंवादात पाहायला मिळाला.
गुरुवारी पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात ‘प्रभावी वाचन माध्यमे’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, निवृत्त सहायक शिक्षण उपसंचालक संपतराव गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार जयसिंग पाटील सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्राध्यापक डॉ. विश्वनाथ शिंदे होते.
डॉ. शिंदे म्हणाले, प्राचीन काळात मंदिरात व गावागावांत ग्रंथवाचनाची परंपरा होती. लोकांनी वाचावे, यासाठी चळवळ उभी करावी लागते. काय वाचावे, कोणत्या माध्यमाचा वापर करावा, हे लोकांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रंथ आपल्या मनावर दीर्घकालीन संस्कार करतात, तर सोशल मीडिया वा इंटरनेटवरून मिळणारी माहिती अल्पजीवी असते.
संपतराव गायकवाड म्हणाले, मुलांनी वाचन करायचे असेल तर श्रवण चांगले असायला हवे. दुर्दैवाने आजकालच्या शाळांमध्ये श्रवणाची सवय दिसत नाही. श्रवणाच्या सवयीने वाचन विस्तारित होण्यास मदत होते. इलेक्ट्रॉनिक युगात कुटुंबांतही श्रवण व संवाद कमी होत चालला आहे.
डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणाले, पूर्वी लोककला व पारंपरिक माध्यमांकडून शिक्षण व प्रबोधनाचे कार्य होत असे. आता ती अपेक्षा पुस्तकांकडून होत आहे. सध्या पीडीएफ, किंडल यासारखी नवीन वाचन माध्यमे वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. जिथे पुस्तके उपलब्ध होत नाहीत, तिथे ही माध्यमे उपयुक्त ठरत आहेत; परंतु या नव्या माध्यमांना मर्यादा आहेत; त्यामुळे ही माध्यमे मुद्रित माध्यमांची जागा घेऊ शकत नाहीत. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे दुष्परिणाम पाहता शिक्षक व पालकांनी मुलांना वाचन माध्यमे निवडताना मार्गदर्शन केले पाहिजे.
पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. यानंतर (पान ६ वर)


‘ग्रंथोत्सव २०१५’ परिसंवादातील सूर

Web Title: The book is the medium of samskaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.