महागोंडच्या शिक्षकाने राबविला पुस्तक भेटीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:52 AM2017-12-25T00:52:30+5:302017-12-25T01:03:11+5:30
कृष्णा सावंत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : वाढदिवसाच्या माध्यमातून बढेशाही व दिखाऊपणाची संस्कृती उदयास येत असतानाच महागोंड येथील शिक्षक रविकांत सुतार यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या वाढदिवसाला पुस्तक भेट देऊन शाळेत संस्कारक्षम पिढी तयार करण्याचा कृतिशील उपक्रम सुरू ठेवला आहे.
सध्याच्या झगमगाटाच्या दुनियेत वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. टी. व्ही. व सोशल मीडियामुळे आजचे विद्यार्थी, तरुणाईला इतिहासातील नामवंत लेखक, सध्याच्या लेखकांची नावे व त्यांची गाजलेली पुस्तकेही माहीत नाहीत.
तंत्रज्ञानात प्रगती होत असली तरी वाचन संस्कृतीमध्ये समाज खूप
मागे पडत आहे, हे वास्तव आहे.
मात्र, रविकांत सुतार यांच्यासारखी मंडळी वाचन संस्कृती जपण्याचे
काम आजही चोख बजावत
आहेत. शालेय वयातच मुलांना विविध विषयांची ओळख निर्माण व्हावी, या दृष्टीने सुतार प्रयत्नशील आहेत.
वाचन संस्कृतीत वाढ होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व भविष्यातील समाज संस्कारशील बनावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे. महागोंड येथील आप्पासाहेब गायकवाड हायस्कूलमध्ये सुतार हा उपक्रम राबवित असून, यासाठी त्यांना मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकांचे सहकार्य मिळत आहे.
२०० पुस्तकांचे वाटप
आतापर्यंत सुतार यांनी शाळेतील २०० विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला पुस्तके भेट दिली आहेत. समाजात वाचन संस्कृती व भावी पिढी संस्कारशील घडावी याच उद्देशाने उपक्रम राबवीत असल्याचे सुतार यांनी सांगितले.