हवेत बांधल्या जन्मगाठी

By admin | Published: August 1, 2016 12:52 AM2016-08-01T00:52:33+5:302016-08-01T00:52:33+5:30

भाततळीजवळ विवाह : जयदीप-रेश्मा रोप-वेला लटकत बनले जीवनसाथी

Born in the air | हवेत बांधल्या जन्मगाठी

हवेत बांधल्या जन्मगाठी

Next

मलकापूर : काहीतरी आगळेवेगळे करण्याची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या एका गिर्यारोहक तरुणाने गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या एका तरुणीशी रविवारी रोप-वेच्या साहाय्याने अंतराळात जन्माच्या गाठी बांधल्या. कोल्हापुरातील जयदीप जाधव व रेश्मा पाटील अशी त्यांची नावे आहेत. हा अनोखा विवाह सोहळा ऐतिहासिक पावनखिंड परिसरातील जाखणीच्या कड्यावरील दरीत पार पडला.
पारंपरिक विवाह पद्धतीला फाटा देऊन झालेल्या निसर्गाच्या कुशीतील या अनोख्या विवाह सोहळ्यास अनेकांंनी उपस्थित राहून वधू-वरांना शुभेच्छा दिल्या. भाततळी (ता. शाहूवाडी) येथील जाखणीच्या कड्यावर कोल्हापुरातील जयदीप व रेश्मा यांचा हा आगळावेगळा विवाह सोहळा हिल रायडर्स ग्रुप, वेस्टर्न माऊंट, मलय अ‍ॅडव्हेंचर या ग्रुपच्यावतीने आयोजित केला होता.
उपस्थित अतिथींनी वधू-वरावर पुष्पवृष्टी केली. नवदाम्पत्यांना आशीर्वाद दिले. दाट धुके, रिमझिम पाऊसधारा, भिरभिरणारा वारा अशा मंगलमय वातावरणात जयदीप व रेश्मा यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याच्या तयारीसाठी गेले दोन दिवस हिल रायडर्सचे प्रमुख प्रमोद पाटील, वेस्टर्न माऊंटचे विनोद कांबोज, युवराज साळुंखे, मलय अ‍ॅडव्हेंचरचे मेहबुब मुजावर, नीलेश बेर्डे, संतोष पाटील, जम्मू-काश्मीरहून या विवाह सोहळ्यास प्रशांत पाटील, रंगराव देसाई यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, महिला ग्रुपच्या कार्यकर्त्या, आदी उपस्थित होते.
साहसी वृत्तीचा जागर
यावेळी प्रमोद पाटील म्हणाले की, पन्हाळा-पानखिंड या ऐतिहासिक मार्गावरची पदभ्रमंती कोल्हापूरकरांचे वैशिष्ट्य ठरले आहे. गडकोटाच्या संवर्धन जागृतीसाठी मे महिन्यात विशाळगडच्या पायथ्याला व्हॅली क्रॉसिंगचा उपक्रम यशस्वी केला. त्यानंतर जयदीप यांचा विवाह साहसी उपक्रमाद्वारे तेही बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुण्यातीथीच्या पार्श्वभूमीवर घेऊन या परिसरातील जाज्वल इतिहासाबरोबर साहसीवृत्तीचा जागर तरूणाईत घडविला आहे.
वधू-वरांचे ‘सैराट’ आगमन
दुपारी बारा वाजता वधू-वर सैराट पद्धतीने बुलेटवरून विवाहस्थळी दाखल झाले. उपस्थित पाहुण्यांनी केलेल्या ‘जय शिवाजी, जय भवानी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आयोजकांनी जाखणीच्या कड्यावर सुमारे ३५0 फूट लांब व २५0 फूट उंचीवर रोप-वे बांधून वधू-वर व पुरोहितास बसण्याची व्यवस्था केली होती. विवाह सोहळ्याच्या आकर्षक पोशाखात लग्नविधीस पुरोहित सागर ढोली यांनी मंगलाष्टका म्हणण्यास सुरुवात केली.
ग्राममंदिरात स्नेहभोजन
लग्नानंतर दीड किलोमीटर जंगलातून भाततळी येथील ग्रामदेवी सुखाईच्या दर्शनास सारे वऱ्हाड दाखल झाले. या लग्नास गेळवडे, पांढरेपाणी, केंबुर्णेवाडी, मालाईवाडा परिसरातील ग्रामस्थ तसेच पाडळीचे पन्नासभर वऱ्हाडी मोठ्या उत्सुकतेपोटी हजर होते. वर्षा पर्यटनास आलेल्या शंभरहून पर्यटकांनी हा सोहळा नजरेत साठवला. दुपारनंतर मंदिरातच स्नेहभोजन झाले. त्यानंतर शिवप्रेमींच्या शुभेच्छा वर्षावात साहसी लग्नसोहळ्याची सांगता झाली.

Web Title: Born in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.