जिल्ह्यामध्ये लाचखोरांचा टक्का वाढतोय
By admin | Published: February 8, 2016 12:20 AM2016-02-08T00:20:17+5:302016-02-08T00:29:03+5:30
‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांचे मत : पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती नाही; अधिकारी, कर्मचारी निर्ढावले
एकनाथ पाटील -- कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात २०१५ मध्ये ३२ गुन्हे दाखल आहेत, तर २०१६ मध्ये अवघ्या दोन महिन्यांत तब्बल ५ गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यात लाचखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
कमी श्रमात जास्त पैसे मिळविणे, तत्काळ जामीन मिळत असल्याने कायद्याचा धाक नाही, वरिष्ठांचे दुर्लक्ष, दहांपैकी एकच व्यक्ती तक्रार देण्यास पुढे येते, अन्य नऊजण लाच देऊन कामे करून घेतात. यामुळे शेकडो कारवाई होत असल्या तरी शासकीय कार्यालयातील लाच स्वीकारण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही. पैशाच्या मोहापुढे कारवाईची भीती नाही, अशी लाचखोरांची प्रवृत्ती असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.
महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, आरटीओ, नगर भूमापन, बँका, रजिस्ट्रेशन, अन्न व औषध प्रशासन, कारागृह, महावितरण, आदी कार्यालयांत कामाच्या मोबदल्यात लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यातील आठ परिक्षेत्रांमध्ये एकमेव पुणे परिक्षेत्रातील कोल्हापूर विभागाचा कारवाईचा टप्पा सर्वाधिक आहे. त्यामुळे कोल्हापुरात लाचखोरांची संख्या जास्त असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून महिन्याला चार ट्रॅप केले जातात. लाच देऊ नये, लाच देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा पद्धतीने नागरिकांत प्रबोधन केले जात आहे. पोस्टरबाजी, पत्रकबाजी, प्रसारमाध्यमांतूनही जनजागृती केली जात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती, कारवाई होत असताना लाच घेणे काही कमी झालेले नाही. शासकीय कार्यालयांतील विशिष्ट अधिकारी व कर्मचारी निर्ढावले आहेत. लाच स्वीकारल्यानंतर तत्काळ जामीन मिळतो. काही गुन्ह्यांमध्ये उशिरा निकाल लागल्याने अधिकारी बदलून जातात, तर फिर्यादी नको ती कटकट म्हणून आरोपीलाच फितूर होत असतात. त्यामुळे अशा काही प्रकरणांत आरोपी निर्दोष सुटतात. या सर्व कारणांमुळे लाचेच्या कारवाईची भीतीच राहिलेली नाही. समोर खड्डा खोदला आहे, हे दिसत असतानाही शासकीय कार्यालयातील कर्मचारी त्यात उडी मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.
कमी श्रमांत जास्त पैसे मिळविणे ही मानवी प्रवृत्ती आहे, ती बदलली पाहिजे. दहापैकी एक नागरिक तक्रार देतो, अन्य नऊजण पैसे देऊन कामे करून घेतात. त्यामुळे एकाही नागरिकाने पैसे दिले नाहीत, तर लाच घेण्याचे प्रमाण कमी होणार आहे. वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. त्यांचे मनपरिवर्तन करीत नाहीत. त्यामुळे बहुतांश सर्वच शासकीय कार्यालयांत लाच घेऊन कामे केली जात असल्याचे चित्र आहे.
लोकांनी निर्भयपणे तक्रार देण्यास पुढे यावे. आम्ही स्वत:हून प्रत्येक शासकीय कार्यालयात जाऊन प्रलंबित प्रकरणांसाठी उंबरे झिजविणाऱ्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा देत आहोत. त्यामुळे सध्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे.
- उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
कारवाईचा टक्का
महसूल १३पोलीस १२
नगरविकास ७पाटबंधारे १
कारागृह १अन्न व औषध प्रशासन १
महावितरण१प्रादेशिक परिवहन१