बोरवडेच्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने शोधली रांगण्यावर दुसरी तोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:24 AM2021-04-25T04:24:08+5:302021-04-25T04:24:08+5:30
रमेश वारके : बोरवडे : १५ एप्रिलला पावणेदोनशे वर्षांनंतर बोरवडे (ता. कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपने दोन हजार फूट ...
रमेश वारके :
बोरवडे : १५ एप्रिलला पावणेदोनशे वर्षांनंतर बोरवडे (ता. कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपने दोन हजार फूट दरीतून तोफ बाहेर काढल्यानंतर याच ग्रुपने चारच दिवसांत दरीत शोधमोहीम राबविली. यामध्ये त्यांना यश आले असून, दरीतील दुसरी तोफ बाहेर काढली आहे. रांगणा किल्ल्यावर ही तोफ आणली असून, रांगण्याच्या कुशीत ही तोफ आज विसावली. त्रिवेणी रांगणा ग्रुपच्या या धाडसी मोहिमेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. या तोफा त्रिवेणी रांगणा ग्रुपचे मार्गदर्शक महादेव फराकटे यांच्या मार्गदर्शनाखाली शोधल्या जात आहेत.
कोकणातील नारूळ गावच्या दिशेला साधारणपणे १७०० फूट दरीत शोधमोहिमेच्या दरम्यान ही तोफ त्यांना आढळली. साडेआठ फूट लांब असणारी, अंदाजे दोन टन वजनाची, पाठीमागील तोंडेचा साडेचार फूट घेरा आणि पुढील तोंडाचा सव्वादोन फूट घेरा असणारी ही तोफ बाहेर काढण्यासाठी त्रिवेणी रांगण्याचे कार्यकर्ते गेले तीन दिवस झटत होते. या शोधमोहिमेत सुनील वारके, प्रवीण पाटील, बाजीराव खापरे, शरद फराकटे, अमर सातपुते, चंद्रकांत वारके, प्रकाश साठे, जीवन फराकटे, मेजर सुनील फराकटे, नेताजी साठे, रघुनाथ वारके, निखिल परीट, अरुण मगदूम, नेताजी सूर्यवंशी, तानाजी साठे, बजरंग मांडवकर, अवधूत शिंगे, प्रथमेश पाटील, प्रज्योत चव्हाण, भाऊ साठे, राहुल मगदूम हे शिवप्रेमी मावळे सहभागी आहेत.
चौकट करणे-
किल्ल्यावरील सहाही तोफा शोधून त्या रांगण्याच्या कुशीत वसविणे हेच आमचे ध्येय आहे. गडावरील अवशेष दरीत पडले असून, त्यांंचा ढिगारा उपसताना शेजारीच साधारणपणे १७०० फूट दरीत ही तोफ दिसली. वर्षानुवर्षे पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर या तोफा सरकत असून, प्रत्येक वर्षी या तोफा आपल्या जागा बदलत आहेत. या तोफा बाहेर काढणे धोकादायक काम आहे.
- महादेव फराकटे (त्रिवेणी रांगणा मोहीम प्रमुख)
फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथील त्रिवेणी रांगणा ग्रुपचे मावळे रांगण्याच्या दरीतील दुसरी तोफ शोधून ती किल्ल्यावर आणताना. (छाया - सुनील वारके)