विदेशी वृक्षांची लागवड करू नका, तज्ज्ञांची महापालिकेला विनंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 06:14 PM2020-05-21T18:14:28+5:302020-05-21T18:16:46+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत येत्या जून महिन्यापासून शहरात पंधरा हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, यामध्ये विदेशी वृक्षांचा भरणा असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि वनस्पती तज्ज्ञांनी या वृक्षांची लागवड न करण्याची विनंती महानगरपालिकेला केली आहे. यामध्ये वनस्पती तज्ज्ञ आणि निवृत्त प्राचार्य डॉ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र परिवार यांचा समावेश आहे.
जून महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेने शहर परिसरात राबविणार असलेल्या १५ हजार वृक्षारोपणासाठी अनेक देशी आणि विदेशी रोपांची निवड केली आहे. त्याची यादी यापूर्वी झाली आहे. यामध्ये कोनोकार्पस या घातक विदेशी वृक्षाचा समावेश आहे.
दोन प्रजातींमध्ये आढळणारा हा वृक्ष दक्षिण अमेरिका खंडातील आहे. काही देशांत याची लागवड करण्यात आली. तो हिरडा बेहडाच्या कुळातील आहे. याची फळे, फुले आकर्षक नाहीत, पण घनदाट पर्णसांभार व दाट सावली देणारा हा वृक्ष जलद वाढतो म्हणून लागवड केला जातो. परंतु, तो माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे.
आपल्याकडे समृद्ध आणि नैसर्गिक वनस्पती विविधता असतानाही अनेक विदेशी वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहोत. यामुळे आपली स्थानिक जैवविविधता धोक्यात आली आहे. हे थांबविण्याचे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले.
पाणी पिणारा, इमारतींसाठी धोकादायक वृक्ष
कोनोकार्पस या वृक्षाची मोठ्या वेगाने वाढ होते. त्याची मुळे जमिनीत खोलवर शिरतात व सर्व बाजूंनी वेगाने पसरतात. ही मुळे जमिनीतील पाणी मोठ्या प्रमाणात शोषून घेतात. तसेच ती शेजारी असणाऱ्या इमारतींखाली शिरतात. यामुळे इमारती व इतर वृक्षांना धोकादायक ठरतात.
माणसासाठी घातक
कोनोकार्पस वृक्ष माणसांच्या आरोग्यासाठी घातक आहे. याला वर्षातून दोन वेळा फुलांचा बहर येतो. तेव्हा मोठ्या प्रमाणात परागकण तयार होतात व वातावरणात पसरतात. ते माणसांच्या शरीरात श्वासामार्फत जातात. यामुळे घसा व श्वसनाचे आजार होतात. दमा आणि खोकल्याचा त्रास होतो.
देशी वृक्षांचे रोपण करा
बाहवा, तामण, कदंब, कडूलिंब, शिरीष, पांगारा, करंज, बकूळ यांसारख्या देशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणात लागवड करा आणि कोल्हापूरच्या जैवविविधतेचे संरक्षण करा, असे आवाहन निसर्गमित्र परिवाराने केले.