समीरच्या विरोधात दोघांचे जबाब
By admin | Published: July 28, 2016 12:32 AM2016-07-28T00:32:50+5:302016-07-28T00:52:07+5:30
पानसरे हत्या प्रकरण : दोषारोपपत्रावरील सुनावणी १२ आॅगस्ट रोजी होणार
कोल्हापुर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या विरोधात संजय अरुण साडविलकर व शैलेंद्र दिगंबर मोरे या दोघा साक्षीदारांचे जबाब प्रथमवर्ग न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर घेण्यात आले होते. सरकारी पक्षाच्या मागणीनुसार सत्र न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी बुधवारी या जबाबांची नोंद दाखल झालेल्या दोषारोपपत्रामध्ये घेतली. तसेच गायकवाड याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यास उच्च न्यायालयाने दि. ११ आॅगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे बुधवारी होणारी सुनावणी दि. १२ आॅगस्ट रोजी ठेवली.
पानसरे हत्येतील संशयित मारेकरी समीर गायकवाड याच्यावरील दोषारोपपत्र दाखल करण्यासंबंधी सुनावणी बुधवारी होती. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी आरोप निश्चित करण्यासंबंधी उच्च न्यायालयाची स्थगिती आहे; त्यामुळे सुनावणी तहकूब करावी, अशी विनंती अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश बिले यांच्याकडे केली. आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी दि. १२ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवावी, अशी विनंती केली.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार संजय साडविलकर यांच्यासह पानसरे हत्येतील प्रत्यक्ष साक्षीदार शैलेंद्र मोरे या दोघांचे इनकॅमेरा जबाब प्रथम वर्ग न्यायाधीश पाटील यांच्यासमोर झाले. मोरे यांचा दि. १४ व साडविलकर यांचा १७ जुलै रोजी जबाब नोंदविले आहेत. हे जबाब दाखल दोषारोपपत्रामध्ये की पुरवणी तपासामध्ये नोंदवायचे, असा प्रश्न न्यायाधीश बिले यांनी सरकारी वकिलांना केला. त्यावर अॅड. बुधले यांनी दोषारोपपत्रामध्येच नोंद करून घ्यावे, असे सांगितले.
फिरण्यास बंदी घातल्याची तक्रार
समीर गायकवाड हा कळंबा मध्यवर्ती कारागृहात अंडासेलमध्ये बंदिस्त आहे. त्याला सत्र न्यायालयाने दुपारी १२ ते ३ या वेळेत अंडासेलच्या बाहेर फिरण्यास मुभा दिली होती; परंतु कारागृह प्रशासनाने त्याला बाहेर सोडण्यास बंदी घातली आहे. त्याला पहिल्यासारखी मोकळीक द्यावी, अशी विनंती समीरचे वकील पटवर्धन यांनी केली. त्यावर न्यायाधीश बिले यांनी तसा अर्ज द्यावा. तसेच न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाला यासंबंधी नोटीस पाठविली जाईल, असे सांगितले.