उदगावात विचित्र अपघातात दोघे गंभीर
By admin | Published: March 4, 2017 12:32 AM2017-03-04T00:32:04+5:302017-03-04T00:32:04+5:30
रिक्षा-मोटारसायकल यांची समोरा-समोर धडक; जखमीत महिला व बालकाचाही समावेश
जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष गार्डनसमोर रिक्षा व मोटारसायकल यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात मोटारसायकलस्वार गौस गुलाब सनदी (वय ४०, रा. कबनूर, ता. हातकणंगले) व रिक्षाचालक मोहसीन शहाजान नदाफ (वय २२, रा. उदगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत़ तर मोटारसायकलवरील एक महिला व दीड वर्षाचे बालकही जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली-कोल्हापूर महामार्गावर कल्पवृक्ष गार्डनसमोर दुपारी साडेबाराच्या सुमारास मोहसीन नदाफ हा रिक्षा (क्ऱ एम एच ९ जे ३४६६) घेवून उदगावहून जयसिंगपूरकडे येत होता. यावेळी गौस हे मोटारसायकल (क्र. एम एच ०९ डी ई २३९१) ही कबनूरहून सांगलीच्या दिशेने जात होते. यावेळी रिक्षा व मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक झाली. यावेळी मोटारसायकल रिक्षाच्या दर्शनी काचेत मोटारसायकल अडकून राहिली होती. यामध्ये रिक्षाचालक नदाफ याला मोटारसायकलची धडक बसल्यामुळे समोरील काचेची तुकडे व लोखंडी बार लागल्यामुळे नदाफ हा गंभीर जखमी झाला. तसेच मोटारसायकलस्वार गौस सनदी यांच्या तोंडास गंभीर दुखापत झाली असून, दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली आहे. तसेच मोटारसायकलवर असणाऱ्या त्यांच्या पत्नी आयेशा सनदी (वय ३६) व त्यांचा नातू रईस सूरज सनदी (वय २, रा. कबनूर) यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर सांगली-कोल्हापूर माहामार्गावरील सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करून अपघाताचा पंचनामा केला.
बाह्यवळण धोकादायक
उदगाव येथील कल्पवृक्ष गार्डन ते खोत पेट्रोलपंपाच्या दरम्यान बाह्यवळण आहे. उदगावहून येत असलेल्या वाहनांचा अंदाज लागत नसल्याने वारंवार याठिकाणी अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.