राधानगरीत दोन्ही काँग्रेसला संमिश्र यश

By admin | Published: February 24, 2017 10:58 PM2017-02-24T22:58:27+5:302017-02-24T22:58:27+5:30

आघाडी होण्याची शक्यता : जनता दल, शेकाप, स्वाभिमानीचे अस्तित्व संपुष्टात -- राधानगरी जिल्पा परिषद

Both the Congress and the combination of the masses in Radhanagar | राधानगरीत दोन्ही काँग्रेसला संमिश्र यश

राधानगरीत दोन्ही काँग्रेसला संमिश्र यश

Next

संजय पारकर -- राधानगरी --राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच वर्चस्वासाठी लढाई झाली. दोन्ही पक्षाना संमिश्र यश मिळाले. अनपेक्षितपणे शिवसेनेचा प्रवेश झाला असला तरी दोन्ही काँग्रेसच्या लढाईत वेळोवेळी सोयीप्रमाणे आघाडी करीत अस्तित्व टिकवून ठेवलेल्या जनता दल, शेकाप, स्वाभिमानी पक्ष या छोट्या पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले. गेल्यावेळी अर्धी सत्ता मिळविलेल्या राष्ट्रवादीला आरक्षित जागा मिळाल्याने सभापतिपद मिळणार असले तरी बहुमत नसल्याने पुन्हा दोन्ही पक्षांची आघाडी होण्याची शक्यता आहे.
पाच जि. प. गटांपैकी राशिवडे ही जागा राष्ट्रवादीला टिकविता आली. त्यांच्या कौलव व सरवडे या जागा काँग्रेसने खेचून घेतल्या. काँग्रेसच्या ताब्यातील राधानगरीची जागा राष्ट्रवादीने पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा मिळविली. तर कसबा वाळवेतील जागा काँग्रेसने उमेदवारी डावललेल्या व भगवा हातात घेतलेल्या मारुतीराव जाधव यांच्या गटाने पटकावली. पंचायत समितीची तुरंबे गणातील जागा घेऊन आपली ताकद काँग्रेसला दाखवित राष्ट्रवादीलाही धोबीपछाड केले.
काँग्रेससाठी राधानगरीतील निकाल धक्कादायक ठरला. शिक्षण सभापती म्हणून उल्लेखनीय काम केलेल्या अभिजित तायशेटे यांच्या पत्नी आरती तायशेटे यांना राष्ट्रवादीच्या ए. वाय. पाटील यांचे कट्टर समर्थक राजाराम भाटळे यांच्या पत्नी सविता भाटळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. येथील उमेदवारीसाठी सुधाकर साळोखे गटाकडून झालेली मागणी, फेजिवडे गणातील विश्वास राऊत यांना जाहीर झालेली; पण ऐनवेळी ती बदलून अमरेंद्र मिसाळ यांना दिल्याने निर्माण झालेली नाराजी काँग्रेसला भोवली. राधानगरी गणातील सभापतिपदासाठी राखीव जागेवर काँग्रेसच्या जयवंत कांबळे यांना राष्ट्रवादीच्या दिलीप कांबळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कौलव गट बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीला गमवावा लागला. भोगावती कारखान्याच्या नोकरभरतीचा व अंतर्गत नाराजीचा फटका त्यांना बसला. काँग्रेसच्या सदाशिवराव चरापले यांनी येथील सर्व जागा स्वतंत्र लढविल्या. त्यांना मतेही चांगली मिळाली. तरीही इतर सर्व काँग्रेस नेते एकवटल्याने येथील
जिल्हा परिषदेसह एक पंचायत समिती जागा काँग्रेसला मिळाली. काँग्रेसमधील बंडखोरी व शेकापची साथ यामुळे कसबा तारळे गणात राष्ट्रवादीला विजय मिळविणे सोपे झाले.
राशिवडे येथे काँग्रेसचे नेते व ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे यांचा मुलगा सागर धुंदरे यांना काँग्रेसमधून झालेली दुहेरी बंडखोरी नडली. पंचायत समितीसाठी काँग्रेसमधून मच्छिंद्र लाड यांनी बंडखोरी करून ४१७३ मते घेतली. जिल्हा परिषदेसाठी माजी सभापती जयसिंग खामकर यांनी भाजप ताराराणीमध्ये धाव घेतली. त्यांचा पराभव झालाच. शिवाय धुंदरे यांनाही त्याचा फटका बसला.
कसबा वाळवे येथे काँग्र्रेसचे तालुकाध्यक्ष व विद्यमान सदस्य हिंदुराव चौगले यांच्या पत्नी रेखा यांचा धक्कादायक पराभव झाला. माजी सभापती वंदना जाधव यांना शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळाला. येथील पंचायत समिती गणात काँग्रेसचे भरत पाटील यांच्या पत्नी वनिता यांचा विजय त्यांना उभारी देणारा ठरला. जाधव व सुशीला भावके यांच्या विजयाने आमदार प्रकाश आबिटकर यांची ताकद वाढली. येथे राष्ट्रवादीला मात्र मोठा पराभव पत्करावा लागला.
सरवडे येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व ‘बिद्री’चे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे यांच्यात वर्चस्वाची लढाई होती. निर्णायक ताकद असलेला जनता दल सोयीनुसार एकासोबत राहतो.
यावेळी मात्र जनता दल स्वतंत्र लढला. यामुळे काँग्रेसने येथे जिल्हा परिषद
व पंचायत समितीमध्ये मोठ्या
फरकाने विजय मिळविला. सोळांकूर पंचायत समितीची जागा मात्र राष्ट्रवादीने काँग्रेसकडून हिसकावून घेतली.


जि. प.च्या पाचपैकी दोन जागांसह काँग्रेसने आपले स्थान कायम राखले. राष्ट्रवादीला मात्र एक जागा गमवावी लागली. ही जागा सेनेने पटकावली. तर पंचायत समितीमध्ये दहापैकी पाच जागा जिंकल्या. काँग्रेसला पूर्वी इतक्याच चार जागा मिळाल्या. एका ठिकाणी शिवसेना विजयी झाल्याने पूर्ण बहुमत नसल्याने उपसभापती निवडीवेळी पेच निर्माण होणार आहे.

Web Title: Both the Congress and the combination of the masses in Radhanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.