दोन्ही काँग्रेसची मदार चंदगडच्या दोन सदस्यांवर
By admin | Published: February 26, 2017 01:00 AM2017-02-26T01:00:26+5:302017-02-26T01:00:26+5:30
जिल्हा परिषद; पाठिंबा मिळाल्यास सत्ता शक्य
कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्तेसाठी चंदगड तालुक्यातील युवक क्रांती आघाडीतून विजयी झालेल्या दोन सदस्यांवर मदार आहे. त्यांचा पाठिंबा मिळाल्यास काँग्रेस आघाडीला सत्तेपर्यंत जाणे सहजशक्य आहे. कारण या आघाडीकडे आता ३० सदस्य आहेत. स्वाभिमानी व चंदगडच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास ३४ चा आकडा होऊ शकतो, त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
आता काँग्रेसकडे स्वत:चे १४, राष्ट्रवादीचे ११, आमदार प्रकाश आबिटकर व दिनकरराव जाधव गटाचे दोन, आवाडे गटाचे दोन आणि शिंगणापूरमधून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या रसिका पाटील अशा मिळून ३०ची संख्या होते. त्यांना सत्तेसाठी फक्त चारच सदस्य कमी पडतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना मावळत्या सभागृहात एक पद घेऊन पाच वर्षे काँग्रेससोबत होती. या निवडणुकीत संघटनेच्या बालेकिल्ल्यात शिरोळमध्ये भाजपने तीन जागा जिंकून सुरुंग लावला आहे. त्यामुळे संघटना भाजपच्या विरोधात काँग्रेसलाच मदत करू शकते. त्यामुळे हे एकत्रित बळ ३२ वर जाते. सत्तेसाठी फक्त दोनच जागा कमी पडतात. म्हणून काँग्रेस आघाडीने आता चंदगडच्या दोन सदस्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
चंदगड तालुक्यात राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी स्थानिक गरज म्हणून भाजपच्या गोपाळराव पाटील गटाशी आघाडी केली. त्यास पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून मान्यता मिळवली. या आघाडीने युवक क्रांती आघाडीच्या कपबशी चिन्हावर दोन जागा जिंकल्या. कोवाडचे माजी सरपंच कल्लाप्पा सतूराम भोगण हे माणगाव मतदारसंघातून विजयी झाले. तुडिये मतदारसंघातून विद्या विलास पाटील या विजयी झाल्या. आघाडीअंतर्गत हे दोन्ही सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. गोपाळराव पाटील यांचा मुलगा विशाल हा चंदगड मतदारसंघातून तर त्यांचेच कट्टर कार्यकर्ते मल्लिकार्जुन मुगेरी हे तुर्केवाडी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. ही आघाडी निवडणुकीत भाजपच्या म्हणजे स्थानिक गोपाळराव पाटील गटासोबत होती. त्यामुळे आता निकालानंतर ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते. त्यांच्याशी दोन्ही काँग्रेसकडून संपर्क सुरू झाला आहे. शरद पवार यांच्याकडून त्यासाठी एखादा शब्द टाकला गेल्यास कुपेकर यांना तो मोडणे शक्य होणार नाही.
--------------
काँग्रेसकडून अध्यक्ष कोण?
काँग्रेसने सत्तेसाठी पुढाकार घेतला आणि त्यात यश यायचे झाल्यास अध्यक्षपदाचा उमेदवार कोण हादेखील अत्यंत कळीचा मुद्दा आहे. सध्यातरी राहुल पाटील, बजरंग पाटील (गगनबावडा) ही दोनच नावे पुढे आहेत. बजरंग पाटील हे आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी हे दोन्ही सदस्य जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातील आहेत. मावळत्या सभागृहातही त्यांच्याच कार्यकर्त्या असलेल्या विमल पाटील या अध्यक्ष होत्या.