नोटाबंदीविरोधात दोन्ही काँग्रेस रस्त्यावर

By admin | Published: January 10, 2017 12:27 AM2017-01-10T00:27:10+5:302017-01-10T00:27:10+5:30

अनोखे आंदोलन : मोदी सरकारविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमला; एटीएमवरील पैसे काढण्याचे निर्बंध हटविण्याची मागणी

Both the Congress streets against the protestors | नोटाबंदीविरोधात दोन्ही काँग्रेस रस्त्यावर

नोटाबंदीविरोधात दोन्ही काँग्रेस रस्त्यावर

Next

कोल्हापूर : ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत कोल्हापुरात सोमवारी नोटा बंदीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील एटीएम मशीनमध्ये म्हशी बांधण्यासाठी गेले पण, पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले.
शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेश सदस्य आर. के.पोवार व शहराध्यक्ष राजेश लाटकर व महापौर हसिना फरास यांच्या नेतृत्वाखाली हे नोटाबंदीविरोधी अनोखे आंदोलन केले. सकाळी सर्वजण महाराणा प्रताप चौकात जमले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यासह महापालिकेचे नगरसेवक, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. चार म्हशी घेऊन पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते लक्ष्मी रोडमार्गे लक्ष्मीपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेजवळ आले. त्यावेळी पायरीवरून एटीएममध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी म्हशी नेल्या. त्यावेळी लक्ष्मीपुरी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. त्यावेळी पोलिस आणि कार्यकर्ते यांंच्यात काही काळ झटापट झाल्याने गोंधळ उडाला. ‘वैरण नाही आम्हाला, दूध नाही तुम्हाला’ असे फलक म्हशीवर लावण्यात आले होते. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला.
या आंदोलनात कार्याध्यक्ष अनिल कदम, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, प्रा. जयंत पाटील, माजी स्थायी सभापती आदिल फरास, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमोल माने, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, राष्ट्रवादी गटनेते सुनील पाटील, नगरसेवक अफझल पिरजादे, नगरसेविका सरिता मोरे, माजी स्थायी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक विनायक फाळके, निरंजन कदम, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, शीतल तिवडे, सुनील देसाई, आदींचा सहभाग होता.


खासदारांचे भजन अन् लाटकरांचा ठेका
खासदार धनंजय महाडिक यांच्या गु्रपने महामार्गावर ठिय्या मारत चक्क भजन सुरू केले. ‘मोदींनी पैसे भरायला लावले बॅँकेत....गोरगरीब जनता राहिली रांगेत!’ या भजनावर महाडिक यांच्यासह ए. वाय. पाटील, के. पी. पाटील हे टाळ-मृदंगाच्या गजरावर चांगलेच तल्लीन झाले, तर शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी तर चक्क ठेकाच धरला.


टायरी पेटविण्यास मज्जाव!
आंदोलनाच्या सुरुवातीस कार्यकर्त्यांनी महामार्गावर तावडे हॉटेलनजीक टायरीवर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखले, त्यानंतर आंदोलन संपेपर्यंत पोलिसांची नजर आंदोलनकर्त्यांवर राहिली.
उचलण्यासाठी क्रेन मागवा
महामार्गावरील वाहतूक तुंबल्याने पोलिसांनी आंदोलन कार्यकर्त्यांना उचलण्याची तयारी सुरू केल्याचे मुश्रीफ यांच्या निदर्शनास आले. ‘कार्यकर्त्यांना उचला, पण मी तुम्हाला उचलणार नाही, त्यासाठी तुम्हाला क्रेनच मागवावी लागेल,’ असे पोलिसांना उद्देशून म्हटल्यानंतर एकच हशा पिकला.

काँग्रेसने केला शिवाजी चौकात थाळीनाद
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेऊन ५० दिवस उलटले तरी अद्यापही बँकांसमोरील रांगा कायम आहेत. नवीन चलन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी चौकात ‘थाळी नाद’ आंदोलन करण्यात आले. सुमारे तासभर आंदोलन करून निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व महिला काँग्रेसच्या निरीक्षक मनीषा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात थाळी-नाद आंदोलन केले. जुन्या नोटा बंदीच्या निर्णयाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याच्या निषेधार्थ मोदी सरकारविरोधी घोषणा देऊन निदर्शने करण्यात आली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू होते. त्यामध्ये महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या पाचशे व एक हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या दिवसापासून देशात आर्थिक अराजकता निर्माण झाली आहे. मोदींनी जनतेकडून मागितलेली ५० दिवसांची मुदत संपली आहे. त्यामुळे बँक आणि एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यावरील निर्बंध हटवावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. ज्या कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला, त्यामधून काहीच निष्पन्न झाल्याचे दिसत नाही. ५० दिवस संपल्यानंतरही परिस्थिती काही बदललेली नाही अशीही टीका यावेळी आंदोलनस्थळी करण्यात आली.
आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर, शहराध्यक्षा संध्या घोटणे, सरलाताई पाटील, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, दीपा पाटील, शर्मिला यादव, वर्षा मोरे, लीला धुमाळ, भारती केकलेकर, बाळाबाई निंबाळकर, मोहिनी घोटणे, आसावरी माने, सविता रायकर, सुशीला रेडेकर, रूक्साना सय्यद, नगरसेविका उमा बनछोडे, नीलोफर आजरेकर, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, अ‍ॅड. सुरेश कुराडे, गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, किशोर खानविलकर, संपतराव चव्हाण, एस. के. माळी, दयानंद नागटिळे, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


लक्षवेधी फलक...
अब की बार... झूठ मत बोल यार !
केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र... जनता झाली दरिद्री
‘पेटीएम’ म्हणजे ‘पे टू मोदी’
मोदींनी केला थाट, जनतेची लागली वाट

Web Title: Both the Congress streets against the protestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.