मुलांबरोबरच दोन मातांनी दिली दहावीची परीक्षा : सांगरूळ केंद्रावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:14 AM2018-03-03T00:14:50+5:302018-03-03T00:14:50+5:30
कोपार्डे : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध असते, याचे उत्तम उदाहरण आज दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा
कोपार्डे : माणसाला आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत शिक्षण घ्यायची संधी उपलब्ध असते, याचे उत्तम उदाहरण आज दहावीच्या परीक्षेच्या वेळी पाहायला मिळाले. सांगरूळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगरूळ येथील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरू आहे. यात आपल्या मुलांबरोबर जयश्री कुंभार (रा. सांगरूळ) व मनीषा नलवडे या दोन्ही मातांनी आपल्या मुलांबरोबर परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी हजेरी लावल्याने पर्यवेक्षक, सुपरवायझर व इतर मुलांमध्ये हा कुतुहलाचा विषय बनला आहे.
लताबाई सर्जेराव ताकमारे हे माहेरचे नाव असलेल्या नावावर दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मनीषा महादेव नलवडे (रा. गणेशवाडी, ता. करवीर) या सांगरूळ येथील परीक्षा केंद्रावर गुरुवारी मराठीच्या पहिल्या पेपरला आल्या आणि वयस्कर असलेल्या या परीक्षार्थी विद्यार्थिनीकडे बघून इतर सर्वच मुलांचे डोळे विस्फारले. मनीषा या सध्या आशा वर्कर म्हणून काम पाहतात. मनीषा यांचा आदित्य नलवडे हा मुलगा दहावीची परीक्षा देत आहे. तर महेश नलवडे हा दुसरा मुलगा बारावीची परीक्षा देत आहे; पण आपले करिअर बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलाही आता पुढे येत आहेत, हे या उदाहरणाने समोर आले आहे.
सांगरूळ येथील दुसºया महिला जयश्री तानाजी कुंभार (रा. सांगरूळ) या सध्या अंगणवाडीसेविका आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा ही १२ वीची परीक्षा याच केंद्रावर देत आहे, तर पुतण्या प्रसाद कुंभार १० वीच्या परीक्षेला आपल्या चुलतीबरोबर परीक्षा केंद्रावर आला. त्यांचे लग्न अवघ्या १६व्या वर्षी झाले. यावेळी त्यांचे शिक्षण केवळ नववीपर्यंतच झाले होते; पण जयश्री कुंभार यांचे पती तानाजी कुंभार यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित केले.
यशवंतराव मुक्तविद्यापीठात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला. येथे त्यांनी एस.वाय.बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे; पण दहावीच्या परीक्षेच्या प्रमाणपत्राशिवाय अनेक अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी दहावीसाठी १७नंबरचा फॉर्म भरून दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. आज त्या परीक्षा केंद्रावर परिक्षार्थी म्हणून आल्याने चर्चेला उधाण आले.
मला माझ्या पतीने शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. शक्यतो मुलींना शिक्षण देण्याबाबत पालकांमध्ये अनुत्सुकता दिसते. मात्र, भावी आयुष्यात करिअर करताना निर्माण होणाºया अडचणींमुळे महिला मागे पडतात; पण कोणाचा तरी पाठिंबा मिळाला, तर महिला आघाडीवर येऊ शकतात हे सत्य आहे. - जयश्री कुंभार
शाळा शिकायची वेळ होती त्यावेळी मी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले; पण शिक्षण हा बदलत्या काळाचा पाया आहे. यामुळे आपण कुठे मागे पडू नये म्हणून मी दहावीच्या परीक्षेला बसण्याचा चंग बांधला आणि मी चांगल्या टक्केवारीने पास होणार हा आत्मविश्वास मला आहे, असे सांगितले.
- मनीषा नलवडे