श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’चे दोघे पसार
By admin | Published: April 18, 2016 12:56 AM2016-04-18T00:56:15+5:302016-04-18T00:57:46+5:30
तृप्ती देसाई मारहाण प्रकरण : पोलिसांकडून घरांची झडती; संशयितांनी ठेवले मोबाईल बंद
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर गाभाऱ्यातील प्रवेश प्रकरणावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच श्रीपूजकांसह राष्ट्रवादीचे दोघे कार्यकर्ते पसार झाले. पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांच्या घरांची झडती घेतली. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.
तृप्ती देसाई काही महिलांसह बुधवारी (दि. १३) अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आल्या असताना त्यांना गाभाऱ्यातून बाहेर ओढत श्रीपूजकांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केली. त्याप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता संशयित आरोपी अॅड. केदार वसंत मुनीश्वर, श्रीश रामभाऊ मुनीश्वर, चैतन्य शेखर अष्टेकर, मयूर मुकुंद मुनीश्वर, निखिल शानभाग (सर्व, रा. वांगी बोळ, महाद्वार रोड), राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसन मुरलीधर कल्याणकर, जयकुमार रंगराव शिंदे (दोघे रा. मंगळवार पेठ) आदीजण देसाई यांना मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. या चौकशीचा अहवाल त्यांनी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना सादर केला. त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक देशमुख यांनी पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांची सरकारी फिर्याद घेऊन श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी गंभीर कलमे लावल्याने कारवाईच्या भीतीने श्रीपूजक व ‘राष्ट्रवादी’चे दोघे कार्यकर्ते शनिवारी रात्रीपासून पसार झाले. त्यांनी मोबाईलही बंद ठेवले आहेत.
पोलिसांनी रविवारी पहाटे ‘अंबाबाई’ मंदिरात संशयित श्रीपूजकांवर पाळत ठेवली होती; परंतु ते फिरकलेच नाहीत. त्यानंतर सातही आरोपींच्या घरी झडती घेतली असता ते मिळून आले नाहीत.
श्रीपूजकांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे नातेवाईकही बिथरले आहेत. ते कोठेही लपून राहिले तरी त्यांना अटक करणार असल्याचे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
काही महिलांची नावे निष्पन्न
उच्च न्यायालयाचे निर्देश असतानाही तृप्ती देसाई यांना गाभाऱ्यात जाताना हातवारे करून रोखणाऱ्या काही महिलांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामध्ये काही श्रीपूजकांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. देसाई यांना शिवीगाळ करून अंगावर हळद-कुंकू फेकणाऱ्या महिलांचे चित्रीकरण स्पष्ट दिसत आहे. लवकरच कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करून त्यांची नावे पोलिस रेकॉर्डवर आणली जातील, असे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न
संशयित आरोपींमध्ये केदार मुनिश्वर हे स्वत: वकील आहेत. त्यामुळे पोलिसांनी अभ्यासपूर्ण कलमे आरोपींच्या विरोधात लावली आहेत. सर्वच आरोपींनी अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयात दाखल करण्यासाठी वकिलातर्फे फिल्डिंग लावली आहे.
अशी होणार कारवाई
श्रीपूजकांसह ‘राष्ट्रवादी’च्या दोघा कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी होईल. त्यानंतर १४१ कलमानुसार नोटीस बजावली जाईल. त्यानंतर तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. दरम्यान, या सर्वांनी जामीन घेतल्यास सीआरपीसी कलम ४१ नुसार पोलिस त्यांना चौकशीसाठी बोलावू शकतात.