अवघ्या अडीच हजारासाठी दोघांचा गेला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:21 AM2021-03-07T04:21:48+5:302021-03-07T04:21:48+5:30
कोल्हापूर : व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर ...
कोल्हापूर : व्याजाचे अडीच हजार रुपये देण्यावरून वाढला वाद, मध्यस्थी करणारा रमी क्लबचालक नितीन शिंदे व त्याचा मित्र समीर खाटीक यांचा दहा जणांनी पाठलाग करून तलवार, सत्तूर, कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. टेंबलाई रेल्वे फाटक उड्डाण पुलानजीक घडलेल्या घटनेला तब्बल सात वर्षांनी शनिवारी उजाळा मिळाला. या दुहेरी खूनप्रकरणी न्यायालयाने घायल कवाळे, हाणमा चव्हाणसह नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात वर्चस्ववादातून ही दुहेरी खुनाची घटना घडल्याची चर्चा परिसरात होती.
थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, मृत समीर व आरोपी घायल कवाळे हे टेंबलाई झोपडपट्टीत शेजारी-शेजारी राहतात. २०११ मध्ये समीरचे कुत्रे हणमा चव्हाण व घायल कवाळे यांनी मारले व समीरच्याच घराच्या दारात जाळले होते. त्यातून कवाळे याने समीरचे घर पेटवले होते, तर त्या रागातूनच समीरने घायलच्या खुनाचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, कोटीतीर्थ परिसरातील नितीन शिंदे याच्या रमी क्लबवर समीर खाटीक व अमित हेगडे कामास होते. अमितने हणमा चव्हाणकडून पाच हजार रुपये व्याजाने घेतले, त्याची त्याने परतफेड केली, पण अडीच हजार रुपये व्याजावरून वाद वाढला. त्यात मध्यस्थी करताना नितीनचा हणमासोबत वाद झाला. त्यातून नंतर वाद वाढतच गेला. तत्पूर्वी नितीन व समीरला संपवण्यासाठी हणमा चव्हाण, घायल कवाळे व त्याच्या साथीदारांनी कट रचला. दि. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी नितीन व समीर जेवण करून येऊन रेल्वे उड्डाणपूल चौकात उभारले. त्यावेळी हणमा, घायलसह आठ-दहाजण मोटारीतून आले. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. त्यावेळी समीरला उड्डाण पुलाखालीच संपवले, तर नितीनचा कोयास्को चौकापर्यंत पाठलाग करून त्याचा निर्घृण खून केला.
आईनेच पाहिला मृतदेह
मृत समीरची आई रात्रीच्यावेळी हॉटेलवरील काम आटोपून घरी परतत होती. त्यांना रेल्वे फाटकानजीक पुलाखाली कोणी तरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी पोलिसांना सांगितले. पण तो मृतदेह त्यांच्या मुलालाच असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी हंबरडा फोडला.
फोटो नं. ०६०३२०२१-कोल-नितीन शिंदे(मर्डर)