बाटली तीच, माल तोच, फक्त लेबल बदलले
By Admin | Published: September 15, 2016 12:45 AM2016-09-15T00:45:08+5:302016-09-15T00:45:08+5:30
नेत्यांचा भाजप प्रवेश : मुश्रीफांनी उडविली संजय घाटगे आणि अन्य नेत्यांची खिल्ली
कागल : राज्यात सत्ता असणाऱ्या पक्षाला जाऊन चिकटायचे, असा प्रवास करणारे काहीजण आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. १९९५ मध्ये सेना-भाजप सरकार आले तेव्हा ही मंडळी शिवसेनेत गेली. नंतर कॉँग्रेसचे शासन आल्यानंतर यांनी परत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता भाजप सरकार आल्यानंतर हीच मंडळी भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. यांचा पक्षप्रवेश म्हणजे ‘बाटली जुनीच, आतला माल तोच, फक्त लेबल बदलले’, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची खिल्ली उडविली.
येथील शाहू सभागृहात सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजना मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कागल तालुक्यातील माजी आमदार संजय घाटगे आणि समरजितसिंह घाटगे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले की, समरजितसिंह घाटगे यांच्याबद्दल मी काहीही भाष्य करणार नाही. मात्र, तालुक्यातील दुसऱ्या एका व्यक्तीला पक्षप्रवेश आणि पक्ष बदलाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. यापेक्षा आता काय प्रतिक्रिया द्यायची? ते कोठेही प्रवेश करू शकतात. पक्ष बदलू शकतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एक बडा नेता भाजपमध्ये जाणार आहे. त्याचे नाव आठवडाभरात समजेल, असे चंद्रकांतदादांनी जाहीर केले आहे. या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, ‘बडा नेता’ म्हणजे कोण? मीही अचंबित झालो आहे. कारण व्यक्तीश: मी, सतेज पाटील, पी. एन. पाटील, विनय कोरे, आवाडे अशी नावे असतील तर आश्चर्य करण्याजोगी गोष्ट आहे. सध्या भाजपमध्ये प्रवेश करणारी यादी बघितली तर लोकांनाच त्यांच्याबद्दल, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल उत्सुकता राहिलेली नाही, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
सत्ता गेल्यानंतर दादांना समजेल...
चंद्रकांतदादा पाटील यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळाले आहे. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा विस्तार करून ‘रिझल्ट’ दाखविणे भाग आहे. म्हणून ते त्यांचे काम करीत आहेत. सत्तेमुळे ही नेहमीचीच मंडळी त्यांच्या हाताला लागत आहेत; पण सत्ता गेल्यानंतर दादांना समजेल की, हा पक्षविस्तार नाही, तात्पुरती सूज आहे. याचा अनुभव सध्या ‘कॉँग्रेस’ घेत आहेच, असेही मुश्रीफ म्हणाले.