बुरूजबंद गोलरक्षक-
By admin | Published: January 1, 2017 12:45 AM2017-01-01T00:45:54+5:302017-01-01T00:45:54+5:30
-चंद्रकांत बुवा
गोलरक्षणाला आपल्या कौशल्याने वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या चंद्रकांत बुवाने अनेक सामने अविस्मरणीय बनविले. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेला महाराष्ट्र हायस्कूलचा पहिला खेळाडू बनण्याचा मान त्याने मिळविला. त्याला चकवून गोल करणे हे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंसाठी मोठ्या जिकिरीचे काम असे.
चंद्रकांत दत्तात्रय बुवा याचा जन्म बालिंगा रस्त्यावरील गजानन महाराज कॉलनीत झाला. तरी लहानपणापासून चंद्रकांत शिवाजी पेठेतच राहत होता. वडील दौलतराव विद्यालयात शिक्षक होते. ते कडक शिस्तीचे भोक्ते असल्याने चंद्रकांतचे बालपण कडक शिस्तीत गेले. तथापि, वडिलांना फुटबॉलची आवड असल्याने त्यांनी चंद्रकातला फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. जय शिवराय क्लबमधून तो ४ फूट ११ इंच मापाचे सामने खेळू लागला. या काळात तो कोणत्याही जागेवर खेळत असे.
प्राथमिक शाळेनंतर चंद्रकांत महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दाखल झाला. महाराष्ट्र हायस्कूल म्हणजे फुटबॉल खेळाडू तयार करण्याचा कारखानाच. आप्पासाहेब वणिरे सरांनी त्याला पारखले. चंद्रकांत महाराष्ट्र हायस्कूलच्या फुटबॉल संघामध्ये दररोज गांधी मैदानात सकाळ-संध्याकाळ सरावास येऊ लागला.
वणिरे सरांनी त्याची महाराष्ट्र हायस्कूलच्या संघात गोलकीपर म्हणून निवड केली. रंकाळ्याच्या काठालगत हिरवळीवर डाईव्हचे व गोलकिपिंंगचे प्रॅक्टिस सुरू झाले. एकावेळी एक डझन फुटबॉलसह चंद्रकांतवर विविध प्रकारे किक्सचा मारा सुरू असे. शास्त्रशुद्ध सरावामुळे चंद्रकांतमधील गोलकीपर ताऊन सुलाखून निघाला. महाराष्ट्र हायस्कूलचा संघ शासकीय शालेय राज्यस्तरावरील स्पर्धा खेळण्यास नागपूरमध्ये गेला होता. अमरावती, मुंबई, नागपूर या संघांशी लढती झाल्या. त्या ठिकाणी त्याने आपल्या गोलकीपिंंगचे अप्रतिम दर्शन घडविले. १९७४ मध्ये ठाणे येथे झालेल्या रायस्तरीय शालेय सामन्यातही त्याने आपल्या नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन घडविले. अंतिम सामना मुंबई या बलाढ्य संघाविरुद्ध होता. पावसामुळे गोलपोस्टमध्ये भरपूर तांबड्या मातीचा चिखल झाला होता. अशा चिखलात त्याने १५ ते २० गोल्स मोठ्या शिताफीने वाचविल्या. सामना संपला तेव्हा तो चिखलाने इतका माखला होता की ओळखतही नव्हता.
दरम्यानच्या काळात त्याची महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात गोलकीपर म्हणून निवड झाली. महाराष्ट्र हायस्कूलचा राष्ट्रीय स्तरावर खेळणारा हा पहिला गोलकीपर. या सर्वांचे श्रेय तो आपले वडील, वणिरे सर, आतकिरे सर व डी. बी. पाटील सर यांना देतो.
वयाच्या ३८ व्या वर्षांपर्यंत त्याने गोलकीपर म्हणून कामगिरी केली. शिवाजी तरुण मंडळाने त्याची आपल्या संघात गोलकीपर म्हणून निवड केली. कोल्हापुरात होणाऱ्या सर्व स्पर्धांत त्याने नेत्रदीपक कामगिरी करून बाहेरगावच्या स्पर्धा गाजविल्या. त्याची बॉलवरील डाईव्ह तीक्ष्ण, धारदार होती. नजरेत आत्मविश्वास व डाईव्हमध्ये चपळाई होती. स्ट्रोक घेतेवेळी त्याचे दोन्ही हात गरुड पंखाप्रमाणे पसरत व गोलपोस्ट भरून जाई. त्यामुळे हमखास पेनल्टी मारणाऱ्यांनाही त्याने नामोहरण केले आहे. सांगली, मिरज, गडहिंंग्लज येथील स्पर्धांत आपल्या गोलकीपिंगने त्याने रंग भरला होता.
१९८० मध्ये काही कारणाने चंदूने शिवाजी तरुण मंडळाची साथ सोडली. लगतच असणाऱ्या खरी कॉर्नर येथील मित्र परिवार या संघात त्याला गोलकीपरचे स्थान मिळाले. या संघातूनही चंदूने चांगलीच कामगिरी केली. या संघानेही कोल्हापुरातील भल्या भल्या संघांच्या तोंडचे पाणी पळविले.
पेठेतील न्यू कॉलेज या नामवंत महाविद्यालयात चंदूने पहिली काही वर्षे शिपाई म्हणून काम केले. त्यानंतर कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ पदावर आज तो काम करीत आहे.
क्रीडांगणावरील एक गुणी खेळाडू, फुटबॉल क्षेत्रातील अनिष्ट बाबींपासून सदैव दूर, मैदानावर होणाऱ्या मारामाऱ्या व भांडणे यापासून हा खेळाडू अलिप्त राहिला आहे.
(उद्याच्या अंकात : सुरेंद्र शेलार)