बॉल काढताना पाण्याच्या टाकीत बुडून मुलाचा मृत्यू
By उद्धव गोडसे | Published: May 16, 2024 05:59 PM2024-05-16T17:59:32+5:302024-05-16T17:59:46+5:30
शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता. बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता.
कोल्हापूर - बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे मावशीकडे सुट्टीसाठी गेलेला सर्वेश सुजित राऊत (वय १०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) हा क्रिकेट खेळताना पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढताना पाण्यात बुडाला. बेशुद्धावस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बुधवारी (दि. १५) रात्री त्याचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने इचलकरंजीतील राऊत कुटुंबीयांसह बांबवडे येथील निवास चौगले यांच्या कुटुंबाला धक्का बसला.
शाळेला सुट्टी असल्यामुळे इचलकरंजीतील सर्वेश राऊत हा बांबवडे येथील मावशीकडे गेला होता. बुधवारी सायंकाळी गल्लीतील मुलांसोबत तो क्रिकेट खेळत होता. खेळताना एका इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत गेलेला बॉल काढण्यासाठी गेला असता, तो पाण्यात बुडाला. हा प्रकार लक्षात येताच खेळणा-या मुलांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. निवास वासुदेव चौगले यांनी तातडीने बेशुद्धावस्थेत त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान रात्री नऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
डोळ्यांदेखत सर्वेश पाण्यात बुडाल्याने त्याच्यासोबत खेळणा-या मुलांनाही धक्का बसला. हसता-खेळता मुलगा गेल्याने राऊत आणि चौगले कुटुंबीयांनी सीपीआरच्या आवारात हंबरडा फोडला. सर्वेश याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि आजी असा परिवार आहे.