जरगनगरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर, सहा ठिकाणी तोडले लचके
By उद्धव गोडसे | Published: October 22, 2023 06:26 PM2023-10-22T18:26:04+5:302023-10-22T18:26:13+5:30
क्लासवरून घरी जाताना घडली घटना, महापालिकेने तीन कुत्र्यांना पकडले.
कोल्हापूर: जरगनगर येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग शाळेजवळ भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात विहान विजय शिंदे (वय ९, रा. जरगनगर, कोल्हापूर) हा गंभीर जखमी झाला. कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर सहा ठिकाणी लचके तोडले. हा प्रकार रविवारी (दि. २२) दुपारी एकच्या सुमारास घडला. क्लास सुटल्यानंतर घरी जाताना ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जरगनगर येथील विहान शिंदे हा रविवारी दुपारी लक्ष्मीबाई जरग शाळेजवळ क्लासला गेला होता. क्लास सुटल्यानंतर तो शाळेजवळ असलेल्या वडिलांच्या दुकानाकडे निघाला असता, चार-पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. हा प्रकार लक्षात येताच शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरील कामगारांनी कुत्र्यांना पिटाळून लावले. तोपर्यंत कुत्र्यांनी मुलाला रक्तबंबाळ केले होते. आरडाओरडा ऐकून विहानच्या वडिलांनीही धाव घेतली.
क्रिडाईचे माजी अध्यक्ष महेश यादव यांचा मुलगा मयुरेश याच्या कारमधून जखमी विहानला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे रेबिजचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने सीपीआरमध्ये जावे लागले. कुत्र्यांनी सहा ठिकाणी लचके तोडल्याने विहान खुपच घाबरला होता. चेह-यासह गळ्यावर, पोटावर, मांडीला आणि पायाला जखमा झाल्या आहेत.