‘अमृत जल योजना’ बैठकीवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:46 AM2017-08-22T00:46:36+5:302017-08-22T00:46:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
दानोळी : वारणा बचाव कृती समितीकडून आज, मंगळवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात इचलकरंजीच्या अमृत पाणी योजनेबाबतच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. त्या योजनेस कोणत्याही परिस्थितीत पाणी देणार नाही यावर कृती समिती ठाम आहे, असा निर्णय दानोळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कृती समितीच्या बैठकीत घेतला.
दानोळीतील वारणा नदीतून इचलकरंजीला जाणारी अमृत जल योजनेस वारणा काठावरील गावांचा विरोध आहे. ही योजना रद्द करण्यात यावी अशी शिफारस शासनास करावी, अशी भूमिका कृती समितीची आहे. पंचगंगा व कृष्णा या नद्यांतून इचलकरंजी शहराला बारमाही पाणीपुरवठा केला जातो. दोन मोठ्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित असताना या योजनांबाबत काही किरकोळ व तकलादू अशी कारणे पुढे करून गरज नसताना वारणा नदीतून शेतीचे पाणी उचलण्याचा घाट घातला जात आहे. तो अनावश्यक असून, शेतकºयांवर अन्यायकारक असल्याने वारणा काठावरील सर्व गावांनी या अमृत योजनेस विरोध असल्याचा ठराव करून दोनवेळा गाव बंद ठेवून तीव्र विरोध केला आहे.
दोन्ही कालव्याची कामे अद्याप अपूर्ण आहेत, यासह अनेक कारणांमुळे अमृत योजनेस वारणा काठच्या गावांचा वारणा बचाव कृती समितीच्या माध्यमातून विरोध होता व तो यापुढेही राहील, असा निर्णय बैठकीत झाला.
यावेळी वारणा बचाव कृती समिती अध्यक्ष महादेव धनवडे, उपाध्यक्ष केशव राऊत, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच गब्रू गावडे, काँग्रेस शिरोळ तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, शिवसेना शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे, ग्रामपंचायत सदस्य जंबू सकप्पा, राजाराम माने, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पिसे, बाजार समिती सदस्य संदीप हवालदार, रामचंद्र शिंदे, रावसाहेब भिलवडे, गुंडू दळवी, बापूसो दळवी, मानजीराव भोसले, सुरेश माणगांवे, रावसाहेब खिचडे, उदय होगले, उमेश केकले, सोमा गावडे, श्रीकांत लंबे, प्रकाश लंबे उपस्थित होते.