धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कार: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 05:01 PM2019-02-25T17:01:41+5:302019-02-25T17:04:22+5:30
राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निदर्शने केली. ‘धामणी खोऱ्याचा एकच निर्धार...मतदानावर बहिष्कार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील धामणी धरण प्रकल्पाचे काम गेल्या १८ वर्षांपासून रखडले आहे. जोपर्यंत हे काम सुरू होत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय धामणी खोरा विकास कृती समितीतर्फे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे निदर्शने केली. ‘धामणी खोऱ्याचा एकच निर्धार...मतदानावर बहिष्कार’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दुपारी बाराच्या सुमारास धामणी खोऱ्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी निदर्शने करून शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले. त्यासोबत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या १३ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी केलेले ठरावही सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा तालुक्यांसाठी वरदायिनी असलेल्या धामणी प्रकल्पाचे काम गेल्या अठरा वर्षांपासून रखडले आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्याने धामणी खोऱ्याचा सर्वांगीण विकास खुंटला आहे. त्यामुळे या भागात अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा बसत आहेत. शेती किंवा शेतीपूरक व्यवसायही करणे अवघड झाले आहे.
यासाठी निवेदने, मोर्चे, आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा प्रकल्प ‘जैसे थे’च स्थितीत आहे. त्यामुळे जोपर्यंत या प्रकल्पाचे काम सुरूहोत नाही, तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय शेतकऱ्यानी घेतला आहे.
आंदोलनात सर्जेराव पाटील, गजानन चौधरी, राजेंद्र सावंत, रामदास चौगले, विलास बोगरे, ज्ञानदेव पाटील, महिपती चौधरी, पांडुरंग पाटील, रघुनाथ पाटील यांच्यासह धामणी खोऱ्यातील शेतकरी सहभागी झाले होते.