‘पशुसंवर्धन’च्या आढाव्यावर सदस्यांचा बहिष्कार-
By admin | Published: November 2, 2014 09:56 PM2014-11-02T21:56:31+5:302014-11-02T23:31:42+5:30
-गडहिंग्लज पंचायत समिती सभा
गडहिंग्लज : वेळोवेळी मागणीचा ठराव करूनदेखील तालुक्यातील जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टरांच्या रिक्त जागा न भरल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत पशुसंवर्धन विभागाच्या आढाव्यावर बहिष्कार टाकला.
सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेत शिक्षण, आरोग्य व बांधकाम खात्याच्या कामकाजावर जोरदार चर्चा झाली. प्र. गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.
‘नरेगा’ योजनेतून वर्षभरात ठोस काही मिळाले नाही. म्हणजे जनतेची शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप बाळेश नाईकांनी केला. पशुधन विकास अधिकारी डॉ. पल्लवी मिरजकर या आपल्या विभागाचा आढावा देत असताना ‘नरेगा’चा मुद्दा उपस्थित झाला. याबाबत अभ्यास करून चार दिवसांत माहिती देण्याचे आश्वासन उपसभापती तानाजी कांबळे यांनी दिले.
वस्तीशाळा शिक्षकांच्या थकित वेतनाच्या मुद्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्हा पातळीवरून अनुदान कमी आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांनी सांगितले. सकारात्मक आश्वासनाअंती या विषयावरील प्रदीर्घ चर्चा थांबली.
हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या रिक्त पदाचा मुद्दा नाईकांनी उपस्थित केला. आपण स्वत: त्या केंद्रात आठवड्यातून ३ दिवस सेवा देत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अथणी यांनी सांगितले. रूग्णांच्या सोईसाठी तसा फलक का लावला जात नाही, असा सवालदेखील नाईकांनी विचारला. मीना पाटील यांनी रस्त्यांच्या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
पंचायत समिती सदस्य इकबाल काझी, सरिता पाटील व रजनी नाईक, प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अभिनंदन अन् निषेधही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नूतन मंत्रिमंडळाच्या अभिनंदनाचा ठराव नाईकांनी मांडला. आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर व जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदय जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव स्नेहल गलगले यांनी मांडला. ‘बेळगाव’चे नाव ‘बेळगावी’ केल्याबद्दल कर्नाटक शासनाच्या निषेधाचा ठरावही नाईकांनी मांडला.
अभिनंदन अन् दुर्दैवही
प्रत्येक सभेत अभिनंदन व श्रद्धांजलीचे ठराव होतात. परंतु, संबंधितांना त्याबाबत एकही पत्र जात नाही. यासारखी दुर्दैवी बाब नाही, अशी खंत नाईकांनी व्यक्त केली. याबाबत सूचना संबंधितांना देण्याचे आश्वासन उपसभापती कांबळे यांनी दिले.