बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार, राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 02:58 PM2023-02-01T14:58:02+5:302023-02-01T14:58:28+5:30
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग इतर अनेक प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित
कोल्हापूर : राज्यातील सर्व अकृषक विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवा वेतन आयोग इतर अनेक प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने उद्या, गुरुवारपासून बारावीसह सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार असे आंदोलन सुरू करण्यात येईल. यामध्ये शिवाजी विद्यापीठ सेवक संघ सहभागी होईल, अशी माहिती संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक मिलिंद भोसले, आनंदराव खामकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, सुधारित आश्वासित प्रगती योजना, रिक्त पदांची भरती अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी चार वर्षांपासून शासनाकडे संयुक्त कृती समितीचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, केवळ आश्वासनाशिवाय समितीच्या पदरात काहीही पडलेले नाही. त्यामुळे समितीने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणून गुरुवारपासून राज्यातील विविध विद्यापीठ, महाविद्यालयांतील सुमारे ४० हजार कर्मचारी बारावीसह सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.
दरम्यान, आंदोलनाची माहिती देण्यासाठी दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारात सेवक संघाची द्वारसभा झाली. सभेस संजय पवार, राम तुपे, विनया कुंभार, वंदना गुरव, माधुरी कुलकर्णी आदी उपस्थित होते.