...तर सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार
By admin | Published: December 2, 2015 01:09 AM2015-12-02T01:09:25+5:302015-12-02T01:16:00+5:30
रेणुका भक्त मंडळ आक्रमक : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
कोल्हापूर : येत्या २४ डिसेंबर रोजी सौंदत्ती (कर्नाटक) येथे डोंगरावर यलम्मा देवीची यात्रा भरते. या यात्रेसाठी तीन दिवस कोल्हापूर शहरातील यात्रेकरू मोठ्या संख्येने जातात; पण तेथे यात्रेकरूंना मूलभूत सुविधांपासून वंचित राहून गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने करवीरनिवासिनी रेणुका भक्त संघटनेच्या वतीने बेळगाव येथे जाऊन जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेऊन निवेदन दिले. मूलभूत सुविधा पुरवणार नसाल तर या सौंदत्ती यात्रेवर बहिष्कार घालण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.डिसेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी तात्पुरती व्यवस्था करण्याचे आश्वासन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या कायमस्वरूपी मूलभूत सुविधांच्या कामांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली असून, या सुविधा पोळ्याच्या पौर्णिमेपर्यंत पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. सौंदत्ती येथे २४ डिसेंबर रोजी रेणुका (यलम्मा) देवीची यात्रा भरत आहे. यासाठी कोल्हापूर शहर आणि परिसरातून सुमारे साडेचार लाख भाविक मुख्य यात्रेच्या तीन दिवस अगोदर सांैदत्ती डोंगरावर दाखल होतात. हे सर्व भाविक उघड्या माळावर राहत असल्याने तेथे या भाविकांना गैरसोयींचा सामना दरवर्षी करावा लागतो.
जुगुळबाई देवीचा अस्वच्छ कुंड, तेथे महिला आणि पुरुषांना अंघोळीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, शौचालयांचीही सोय करावी, तसेच डोंगरावर गेल्यावर तेथेही अंघोळीसाठी सुसज्ज सोय करावी, सार्वजनिक वीजखांबांवरील दिवे घालविण्याचे होणारे प्रकार थांबावेत, रेणुका मंदिरात तत्पर दर्शनासाठी ५० रुपये असताना १०० रुपये अनधिकृतपणे उकळले जातात, अशीही तक्रार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. बेळगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या करवीरनिवासिनी रेणुका भक्त मंडळाच्या शिष्टमंडळात अध्यक्ष प्रशांत खाडे, उपाध्यक्ष बाबूराव पाटील, सचिव उदय पाटील, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, किरण मोरे, सदाशिव सावंत्रे, सुरेश बिरंबोळे, सुनील मोहिते, बाबा कराळे, अनिता पाटील, मंगल महाडिक, नगरसेवक निलोफर आजरेकर, अशकीन आजरेकर व रेणुका भक्त मंडळाचे ७५ कार्यकर्ते सहभागी होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही
डिसेंबरमधील यात्रेपुरती तात्पुरती व चांगली सोय करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी दिले; तर कायमस्वरूपी पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी शॉवर व महिलांसाठी शौचालय करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागेल. त्याबाबत निविदा काढण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे ते म्हणाले. यंदा डोंगरावर यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.