जागृती मेळाव्यावर महिला व बालविकास समितीचाच बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:12 PM2019-03-08T13:12:07+5:302019-03-08T13:17:20+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला.
कोल्हापूर : जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेला जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्यावर ज्या विभागाने या मेळाव्याचे आयोजन केले त्याच खुद्द महिला व बालकल्याण विकास समितीनेच बहिष्कार टाकला.
खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. त्यांनी गेल्या पाच वर्षांत खूप चांगली कामगिरी केली असल्याने त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी आपण सर्वांनी मदत करूया, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.
ज्यांना जिल्हा परिषद नीट सांभाळता आली नाही, त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला अध्यक्षा महाडिक यांनी संजय मंडलिक यांचे नांव न घेता लगावला.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्डमधील रामकृष्ण हॉलमध्ये महिला कायदेविषयक जाणीव जागृती मेळावा आणि पोषण पंधरवडा प्रारंभ सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी आदर्श अंगणवाडी सेविका म्हणून आक्काताई ढेरे यांचा आणि राष्ट्रीय पोषण आहार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजश्री साळसकर यांचा सत्कार केला. मेळाव्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतुक खासदार महाडिक यांनी केले, तर भारताची भावी पिढी सुदृढ बनविण्यासाठी झटणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची आपल्याला जाणीव आहे, यापूर्वीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आणि महिलांचे प्रश्न संसदेत मांडून ते सोडविले आहेत. त्यांच्या वयोमर्यादेत वाढ, पेन्शन आणि इतर प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद अध्यक्षा महाडिक यांनी खासदार महाडिक हे कु टुंबातील सदस्य आहेत, त्यांनी खूप चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांनी आवाहन केल्यानुसार त्यांना निवडणुकीत मदत करण्याची ग्वाही दिली.
शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांनी समाज घडविण्याचे राष्ट्रीय कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी जिल्हा परिषद असल्याचे सांगितले.पक्षप्रतोद विजय भोेजे यांनी महिलांनी महिलांचे शत्रू बनू नये, स्त्री भ्रूणहत्येला विरोध करावा, मुलींच्या जन्माचे स्वागत करा, असे आवाहन केले.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणाऱ्या खासदार महाडिक यांना चौथ्यांदा संसदरत्न मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पल्लवी थोरात यांनी ‘महिलांच्या हितासाठी असलेले कायदे आणि महिलांची कर्तव्ये’याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)सोमनाथ रसाळ, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.
सभापती वंदना मगदूम अनुपस्थित
इचलकरंजीतील कार्यक्रमातील लोकप्रतिनिधींच्या नावावरून बुधवारी जिल्हा परिषदेच्या सभेत दिलगिरीची वेळ आलेल्या महिला व बालविकास सभापती वंदना मगदूम यांनी या जागृती मेळाव्यास समिती सदस्यांसह दांडी मारली. हा कार्यक्रम शुक्रवारी जागतिक महिला दिनी घेण्याऐवजी सर्वांना विश्वासात न घेता गुरुवारीच घेतल्याने सभापती मगदूम यांनी नाराजी व्यक्त केली.