अंध मतदारांसाठी ‘ब्रेल’ची नक्कल मतपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:59 AM2019-04-16T00:59:51+5:302019-04-16T00:59:55+5:30
प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : लोकसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अंध मतदारांसाठी बे्रललिपीतील नक्कल (डमी बॅलेट पेपर) ...
प्रवीण देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लोकसभा मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून अंध मतदारांसाठी बे्रललिपीतील नक्कल (डमी बॅलेट पेपर) मतपत्रिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावरील नावांची शहानिशा करून संबंधित मतदाराला मतदान यंत्रावरील उमेदवारांच्या नावासमोरील क्रमांकानुसार मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्ह्यात ४२३६ अंध मतदार असून सर्वाधिक ८२० कागल विधानसभा मतदारसंघात आहेत.
अंध मतदारांसाठी यापूर्वीच्या निवडणुकीत मतदान यंत्रावर (ईव्हीएम) उमेदवारांच्या नावासमोर ब्रेललिपीतील क्रमांक होते. अशी रचना या निवडणुकीतही असणार आहे; परंतु यावेळी या मतदारांसाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती म्हणजे, मतदान यंत्रावर मतदान करण्यापूर्वी या मतदारांना उमेदवारांच्या नावाची ब्रेललिपीतील एक नक्कल मतपत्रिका संबंधित मतदान केंद्राध्यक्षांकडून दिली जाणार आहे. त्यावर त्या उमेदवाराचे नाव, चिन्ह व क्रमांकाची शहानिशा करता येऊ शकेल. त्यानंतर मतदाराला मतदान यंत्रासमोर जाऊन थेट मतदान करता येणे शक्य होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रथमच ही सुविधा निवडणूक आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे मतदारांना मतदान करताना कोणताही त्रास होणार नाही याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आयोगाकडून जिल्हा निवडणूक विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.
या ‘ब्रेल’लिपीतील मतपत्रिका निवडणूक विभागाला दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत प्रथमच अशा पद्धतीने अंध मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविली जाणार आहे.
मतदारसंघ मतदारांची संख्या
चंदगड ४७४
राधानगरी ७८५
कागल ८२०
कोल्हापूर दक्षिण १७३
करवीर ४३२
मतदारसंघ मतदारांची संख्या
कोल्हापूर उत्तर ४५
शाहूवाडी ४३२
हातकणंगले ५१६
इचलकरंजी १३६
शिरोळ ४२३