विद्युत वाहिन्यांना स्पर्श करत असलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:47+5:302021-05-20T04:26:47+5:30
शित्तूर-वारुण : शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील गावे व वाड्या-वस्त्या या घनदाट झाडी व डोंगरदऱ्यांत विखुरलेल्या असून या परिसरामध्ये वीज ...
शित्तूर-वारुण :
शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील गावे व वाड्या-वस्त्या या घनदाट झाडी व डोंगरदऱ्यांत विखुरलेल्या असून या परिसरामध्ये वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिन्या या अशाच झाडाझुडपातून गेल्या असल्यामुळे भर पावसात व वादळी वाऱ्यांमध्ये झाडांच्या फांद्या या विजेच्या खांबांवर व विद्युत वाहिन्यांवर कोसळत असल्यामुळे या परिसराला गेल्या काही दिवसांपासून सतत अंधारात रहावेे लागत आहे.
वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे या परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठ्यातही कमालीचा व्यत्यय निर्माण झाला असून एक दिवस आड नळाला येणारे पाणी आता चार ते पाच दिवसानंतर येऊ लागले आहे. शित्तूर-वारुण गावातील काही वाड्या वस्त्यांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गायब झालेली स्ट्रीट लाईट अद्यापही पूर्ववत झालेली नाही.
शाहुवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील तुरूकवाडी, कोतोली, रेठरे, मालेवाडी, विरळे, सोंडोली, कांडवण, मालगाव, खेडे, शित्तुर-वारुण, उदगिरी, उखळू, अंबाई वाडा, ढवळेवाडी, केदारलिंगवाडी आदी वाड्या-वस्त्यांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत तारा या डोंगरदऱ्यातील झाडाझुडपातून गेलेल्या आहेत. काही वेलींनी विद्युत खांबांना विळखा घातलेला असून विद्युत तारांशी झाडाझुडपांच्या होत असलेल्या घर्षणामुळे व विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या पडल्याने, वादळवाऱ्यात विजेचे खांब कलल्याने या परिसरामध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
पावसाळा तोंडावर आला असल्याने येणाऱ्या काळात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी व संभाव्य धोका टाळण्यासाठी विद्युत वाहिन्यांना स्पर्श करत असलेली व त्यांच्या लगत असलेली झाडेझुडपे ही पावसाळ्यापूर्वीच तोडणे गरजेचे आहे.
फोटो :
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) पाणी परिसरात विजेचे खांब असेेे कलले आहेत. काही ठिकाणी झाडाझुडपांचा स्पर्श विद्युत वाहिन्यांना होत आहे. (छाया : सतीश नांगरे)