कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर हरपला, रसिकांची ना. धों. महानोरांना आदरांजली 

By संदीप आडनाईक | Published: August 4, 2023 04:17 PM2023-08-04T16:17:57+5:302023-08-04T16:21:12+5:30

पळसखेडाच्या सुपुत्राचे करवीरच्या मातीशी जपले ऋणानुबंध

Brand ambassador of Kolhapur style dam Namdeo Dhondo Mahanor passed away | कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर हरपला, रसिकांची ना. धों. महानोरांना आदरांजली 

कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर हरपला, रसिकांची ना. धों. महानोरांना आदरांजली 

googlenewsNext

संदीप आडनाईक

कोल्हापूर : ज्येष्ठ रानकवी ना. धाें. महानोर यांच्या आठवणी कोल्हापूरकर रसिकांनी आपल्या काळजात जपून ठेवल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर हरपला अशा शब्दात कोल्हापूरकरांनी महानोरांना आदरांजली वाहिली आहे. पळसखेडाच्या या सुपुत्राने करवीरच्या मातीशी जपलेले ऋणानुबंध अरुण नरके, राम देशपांडे, अरुण नाईक, नीना मेस्त्री नाईक, माई कदम, महेश हिरेमठ अशा अनेकांनी उघड केले.

कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांची निसर्गकवी, लेखक म्हणून जशी ओळख आहे, तशीच संवेदनशील मनाचा कृषी अभ्यासक, आमदार म्हणूनही ओळख आहे. रानातल्या, शेतातल्या कविता त्यांनी केवळ लिहिल्याच नाहीत तर १९७८ मध्ये विधानपरिषदेवर नियुक्त झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना विधिमंडळात मांडल्या. पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेसाठी त्यांनी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सर्वत्र असले पाहिजेत यासाठी सरकारकडे आग्रह धरला होता, अशी माहिती अरुण नरके यांनी सांगितली.

अरुण नरके यांच्याशी स्नेहबंध

नरके यांच्या बोरगावच्या शेताची, शेततळ्याची पाहणी करण्यासाठी महानोर स्वत: आले होते. त्यांच्या आग्रहावरून नरके पळसखेडलाही गेले होते. महानोरांच्या कन्या सरला या कोल्हापुरात आयटीआयमध्ये होत्या, तेव्हा त्यांच्या राहण्याची व्यवस्था स्वत: अरुण नरके यांनी केली होती. २०११ मध्ये अरुण नरके यांच्यासोबत त्यांच्या बोरगाव येथील मळ्यात आणि तेथील भव्य वडाच्या झाडाच्या ढोलीत स्पीकर ठेवून महानोरांच्या गाण्यांचा कार्यक्रम केल्याची आठवण अंतरंगचे महेश हिरेमठ यांनी सांगितली. संग्राहक राम देशपांडे यांच्याकडेही त्यांच्या अनेक आठवणी आहेत.

बाबा कदमांशी मैत्र

कोल्हापूरचे कविवर्य वि. स. खांडेकर यांच्याबद्दल त्यांना आत्मीयता होती. साहित्यिक बाबा कदम यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली होती. बाबा कदम यांच्यासोबत क्लेपासून बनवलेल्या मूर्ती आणि पक्ष्यांचे शरीर भात्यात भरण्याची प्रात्यक्षिके महानोरांनी पाहिली होती, अशी आठवण पुस्तक चळवळीतील कार्यकर्ते अरुण नाईक, मीना मेस्त्री नाईक यांनी सांगितली. महानोर यांच्याशी त्यांचा २५ वर्षांपासूनचा घरोबा आहे. बाबा कदम यांच्या पत्नी माई महानाेरांच्या कवितांच्या चाहत्या आहेत.

Web Title: Brand ambassador of Kolhapur style dam Namdeo Dhondo Mahanor passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.