बिद्रीचा जिल्ह्यात ब्रॅण्ड आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:31+5:302021-02-15T04:22:31+5:30

सरवडे : तीन वर्षांपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिटन ७,५०० मेट्रिक टन गाळप वाढविण्यास मंजुरी देण्यात आली होती. मध्यंतरी ...

The brand of Bidri in the district is due to the cooperation of all of us | बिद्रीचा जिल्ह्यात ब्रॅण्ड आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच

बिद्रीचा जिल्ह्यात ब्रॅण्ड आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच

Next

सरवडे : तीन वर्षांपूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिटन ७,५०० मेट्रिक टन गाळप वाढविण्यास मंजुरी देण्यात आली होती. मध्यंतरी शासनाच्या पातळीवर विलंब झाला आणि हा वाढीव गाळप प्रकल्प तीन वर्षे लांबणीवर पडला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून आता सर्व परवानग्या मिळाल्याने पुढील कार्यवाही वेगाने सुरु असून, पुढील गळीत हंगाम प्रतिदिन ७,५०० मेट्रिक टन गाळपाने सुरु होणार आहे. सहवीज प्रकल्प उभारणीसाठी घेतलेल्या १२७ कोटी कर्जाची पूर्ण परतफेड झाली आहे तर कारखान्याने आजवर सभासदांचे ऊस दर, नोकर पगार व व्यापाऱ्यांची देणीही दिलेली आहेत. त्यामुळे कारखान्याची अर्थिक स्थिती भक्कम असून, तांत्रिक कार्यक्षमताही अव्वल स्थानावर आहे. सर्व दृष्टीने कारखाना आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आघाडीवर असल्याने जिल्ह्यात बिद्रीचा आदर्श ब्रॅण्ड निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले.

बिद्री (ता. कागल) कारखाना कार्यस्थळावर ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली. एक तास पाच मिनिटे अध्यक्ष पाटील यांनी कारभाराचा आढावा घेतला तर अवघ्या पाच मिनिटात विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा संपली.

पाटील म्हणाले, कारखान्याकडे ८ लाख क्विंटल साखर शिल्लक आहे. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत २३९ कोटी इतकी होते तर विक्री केलेल्या साखरेला सरासरी ३,०३४ रुपये इतका दर मिळाला आहे. यावर्षी उत्पादित होणाऱ्या साखरेला गोडावून शिल्लक नाही. त्यामुळे उत्पादित होणारी २ लाख ५० हजार क्विंटल राॅ शुगर काढून ती निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

ते म्हणाले, बीड, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांत पाऊस चांगला झाला त्यामुळे तोडणी मजूर शेती कामात गुंतून गेले. गळीत हंगामात ऊस तोडणी करणाऱ्या टोळ्या कमी प्रमाणात आल्याने स्थानिक टोळ्या केल्या. पर्यायाने या टोळ्यांनीच आपापले ऊस काढणे सुरु केले आणि तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला. यामुळे नाराज झालेल्या काही शेतकऱ्यांनी आपला ऊस प्रतिटन २०० ते ३०० दर कमी असलेल्या कारखान्यांना पाठवला. यात ऊस उत्पादकांचे नुकसान होत असून, मातृसंस्थेला ऊसपुरवठा कमी होत आहे. पुढीलवर्षी ही स्थिती निश्चितच सुधारलेली असेल, असे स्पष्ट करून ऊस पुरवठा केलेला नाही त्यांच्या सवलतीच्या साखरेचा दर २० रुपये केला, त्याचा चांगला परिणामही दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २२ वर्षांपासून कारखान्याला ‘अ’ वर्ग मिळाला असून, यावर्षीही ‘अ’ वर्ग देण्यात आल्याचे सांगितले.

या सभेला जिल्हा दूध संघाचे संचालक विलास कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, भुदरगड तालुका संघाचे अध्यक्ष बाळ देसाई, जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कारखान्याचे माजी संचालक निवास देसाई, सुरेश सूर्यवंशी, सुनील कांबळे, शशिकांत पाटील, विश्वनाथ कुंभार, नाथाजी पाटील, आर. वाय. पाटील, रघुनाथ कुंभार, संग्राम देसाई, दिग्विजयसिंह पाटील यांच्यासह बिद्री कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी नोटीसचे वाचन केले. सचिव एस. जी. किल्लेदार यांनी प्रोसिडिंगचे वाचन केले. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी आभार मानले.

फोटो बिद्री (ता. कागल) येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष के. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सभासद उपस्थित होते. छाया - चांदेकर फोटो, बिद्री

चौकट

१) मास्क वाटप

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कारखान्यात सभेसाठी येणाऱ्या प्रत्येक सभासदाला मास्कचे वाटप करण्यात येत होते. कोविड सेंटर कामगारांकडून सभासदांच्या हातावर सॅनिटायझर मारण्यात येत होते.

२) शांततेत सभा

कारखाना सभा म्हटले की, खाऊच्या पुड्यापासून बसण्यापर्यंत, बसल्यावर कुजबूज मग मध्येच मंजूर असा आवाज. मात्र, यावेळी शिस्तबद्ध येणे, बसणे व एक तास अध्यक्ष यांचे प्रास्ताविक भाषण ऐकून घेण्यापर्यंत शांतता होती. भाषण संपताच मंजूर आणि सभा संपली.

३) कारखान्याला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सभासदांच्यावतीने संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

Web Title: The brand of Bidri in the district is due to the cooperation of all of us

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.