कोवाडमधील अभय पतसंस्थेची धाडसी घरफोडी उघडकीस, तिघे अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:53 PM2020-09-30T16:53:01+5:302020-09-30T16:54:51+5:30
चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील धाडसी घरफोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १५ दिवसांत उघडकीस आणली. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्यांपैकी सुमारे २० लाखांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याकडून हस्तगत केले.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेतील धाडसी घरफोडी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १५ दिवसांत उघडकीस आणली. यामध्ये पोलिसांनी चोरीला गेलेल्यांपैकी सुमारे २० लाखांचे ३९० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरट्याकडून हस्तगत केले.
या प्रकरणी पोलिसांनी महेश ऊर्फ पिंटू सुबराव कोले (वय ३७, रा. नेसरी रोड, कोवाड, ता. चंदगड), सुनील ऊर्फ जान्या रामा तलवार (२२ रा. रणजितनगर, कोवाड), संतोष ऊर्फ राजू ज्ञानेश्वर सुतार (२५ रा. सुतार गल्ली, चिंचणे, ता. चंदगड) यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोवाड येथील अभय ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे कुलूप अज्ञाताने तोडून, संस्थेतील लॉकर गॅस कटरने कापून तब्बल ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने लांबविले होते. याबाबत दि. १२ सप्टेंबर रोजी चंदगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. संस्थेत सर्वसामान्य लोकांनी आपल्या आर्थिक अडचणींकरिता आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले होते. तेच दागिने चोरीला गेल्याने कर्जदार हवालदिल झाले होते.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले यांनी पोलीस पथके तयार करून चंदगड भागात तपास केला.
पथकातील हे. कॉ. श्रीकांत मोहिते यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कोवाड येथून महेश कोले याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्याचे साथीदार सुनील तलवार व संतोष सुतार यांनी ही घरफोडी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी कोले या संशयिताच्या घरातून चोरीचे दागिने जप्त केले. त्यामध्ये सोन्याचे गंठण, सोन्याच्या चेन, अंगठ्या, नेकलेस, टॉप्स, कानवेल, मोहनमाळ, पुतळी अशा एकूण सुमारे ३९० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तिन्हीही आरोपींना मुद्देमालासह चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.