उमेदवारांच्या गावांत मतदानासाठी चढाओढ

By admin | Published: April 24, 2017 01:14 AM2017-04-24T01:14:13+5:302017-04-24T01:14:13+5:30

भोगावती साखर कारखाना निवडणूक : सकाळी उत्साह; दुपारी मतदान केंद्रांवर नीरव शांतता

Brawl for the voters in the villages of the candidates | उमेदवारांच्या गावांत मतदानासाठी चढाओढ

उमेदवारांच्या गावांत मतदानासाठी चढाओढ

Next



कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्याच्या मतदानासाठी सकाळी उत्साह दिसत होता, पण दुपारी बारानंतर सर्वच केंद्रांवर अक्षरश: नीरव शांतता पसरली होती. दुपारनंतर वयोवृद्ध, आजारी व परगावाचे मतदान आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली.
सकाळी लवकर मतदान करून शेतात जाण्याची धांदल सर्वच गावांत पाहावयास मिळाली. त्यामुळे सकाळी दहापर्यंत काही अपवाद वगळता बहुतांशी केंद्रांवर गर्दी दिसत होती. पहिल्या दोन तासांत ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दुपारी बारानंतर उन्हाचा तडाखा वाढू लागला तशी मतदान केंद्रे ओस पडू लागली. दुपारी दोनपर्यंत सर्वच केंद्रांवर अक्षरश: निरव शांतता होती. दुपारनंतर राहिलेल्या मतदारांचा शोध कार्यकर्त्यांनी सुरू केला होता. कोणाचे मतदान राहिले, त्याचा पाठलाग करून मतदान करण्यासाठी धडपड सुरू होती.
त्यासाठी प्रत्येक आघाडीने स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती. ज्या गावात उमेदवार आहे, तिथे ही यंत्रणा अधिक गतीने काम करताना दिसत होती. सडोली खालसा, वाशी, हसूर, राशिवडे, कौलव, घोटवडे, ठिकपुर्ली येथे मतदानात कमालीची चुरस पाहावयास मिळाली.
ज्या गावात कोणत्याही आघाडीचा उमेदवार नाही, तेथील वातावरण हलके-फुलके दिसत होते. तिन्ही आघाडीचे कार्यकर्ते एकत्रित गप्पा मारत मतदारांच्या प्रतीक्षेत बसलेले दिसत होते. भोगावती येथे बिगर उत्पादक गटातील मतदान झाले. संस्था प्रतिनिधींचे मर्यादित मतदान असल्याने ही प्रक्रिया वेगाने पूर्ण झाली.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार संपतराव पवार, कृष्णराव किरुळकर, धैर्यशील पाटील-कौलवकर, सदाशिवराव चरापले, अरुण डोंगळे आदी नेत्यांनी करवीर व राधानगरी तालुक्यांतील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.
भोगावती साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी मतदानादिवशी सत्तारूढ व विरोधी पॅनेलमध्ये कमालीची चुरस दिसून आली. ‘पॅनेल टू पॅनेल’ प्रचार सुरू असला तरी पॅनेलविषयी नाराजी असल्यास आपला बळी जाऊ नये म्हणून ‘माझ्यापुरतं बघा’ असा सिंगल व्होटिंगचा संदेश काही उमेदवारांनी रात्रीत मतदारांना दिल्याची चर्चा मतदान बहुतांश मतदान केंद्रांबाहेर सुरू होती.
एकाच केंद्रात चार-पाच मतदान कक्ष!
२१ जागांसाठी ७४ उमेदवार रिंगणात होते. बिगर उत्पादक गट वगळता एका सभासदाला दहा मतपत्रिका दिल्या
होत्या. त्यामुळे साहजिकच मतदानासाठी वेळ
लागणार म्हणून एका केंद्रात चार ते पाच मतदान
कक्ष उभारले होते. परिणामी, मतदान केंद्राबाहेर फारशा रांगा दिसत नव्हत्या.
शिरगावमध्ये दीडपर्यंत ८२ टक्के
राधानगरी तालुक्यातील शिरगावमध्ये एका केंद्रावर दुपारी दीड वाजता २९६ पैकी २४२ मतदारांनी मतदान (८२ टक्के) केल होते. येथे एका-एका मतासाठी तिन्ही आघाड्यांमध्ये झटापट सुरू होती.
प्रत्येक गावात ५०-१५० मतदार मृत
कारखान्यासाठी ३० हजार ५१८ मतदान आहे; पण यातील सुमारे साडेतीन ते चार हजार सभासद मृत आहेत. प्रत्येक गावात जाईल त्या ठिकाणी ५० पासून १५० पर्यंत मृत सभासदांची यादीच कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होती.

Web Title: Brawl for the voters in the villages of the candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.