बंगला फोडून दहा लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 08:19 PM2020-01-01T20:19:04+5:302020-01-01T20:19:33+5:30
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृह परिसरातील बंद बंगला फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, घड्याळ, रोकड असा सुमारे दहा लाख ...
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृह परिसरातील बंद बंगला फोडून चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, घड्याळ, रोकड असा सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. २६ ते २७ डिसेंबरदरम्यान ही चोरी झाली. प्रताप विष्णू पुराणिक (वय ७०, रा. प्रेरणा बंगला, तीर्थ गार्डन, सरक हाऊस) यांनी ३१ डिसेंबरला शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ज्येष्ठ नागरिक असलेले प्रताप पुराणिक हे २६ डिसेंबरला आपल्या कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या प्रेरणा बंगल्याचे कुलूप व कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. शयनगृहातील तिजोरी उचकटून त्यातील पाच तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या चार नग, आठ ग्रॅमची सोन्याची अंगठी, मोत्याच्या वाट्या असलेला सर, मोत्यांचा तीनपदरी सर, मोत्यांचा वेल, मोत्यांची सोन्यात बांधलेली अंगठी, चांदीच्या वाट्या, चांदीची नाणी, सोन्याचे पाणी दिलेले हातातील घड्याळ, अमेरिकन डायमंड असलेले टॉप्स, दुर्बीण, रोकड असा १० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. २८ डिसेंबरला पुराणिक घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फोन करून चोरीची माहिती दिली. त्यानंतर ३१ डिसेंबरला त्यांनी रीतसर चोरीची तक्रार दाखल केली. सराईत चोरट्याने पाळत ठेवून ही चोरी केल्याचे समजते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड तपास करीत आहेत.
-----------------------
- एकनाथ पाटील