बँकेतील भ्रष्ट कारभार मोडून काढणार
By admin | Published: March 18, 2015 10:34 PM2015-03-18T22:34:19+5:302015-03-19T00:01:12+5:30
विश्वासराव माने : मूठभर संचालकांमुळे बँक बनलीय गुंडांचा अड्डा
भारत चव्हाण - कोल्हापूर अनावश्यक खरेदी, वारेमाप खर्च, बोगस बिले सादर करून प्रवास भत्ते उचलणे यासारखे अनेक प्रकार राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट बॅँकेत घडत असून, हा भ्रष्ट कारभार मोडून काढून तेथे स्वच्छ व पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राजर्षी शाहू आदर्श पॅनेलचे प्रमुख व बँकेचे विद्यमान संचालक विश्वासराव माने यांनी बॅँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ‘लोकमत’कडे आपली भूमिका मांडताना दिली. मूठभर संचालकांमुळे बॅँक ही गुंडांचा अड्डा बनला असून, राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला लागलेला हा कलंक पुसून टाकण्यात सभासद पुढाकार घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुंडगिरी, दहशत निर्माण करून तसेच प्रसंगी विरोधी भूमिका घेणाऱ्या संचालकांवर दबाव टाकून, धमक्या देऊन बॅँक आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न रवींद्र पंदारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे, असा आरोप विश्वासराव माने यांनी केला. गैरकारभाराची माहिती देताना माने यांनी सांगितले की, सत्तारूढ पंदारे गटाने गेल्या पाच वर्षांत संस्थेच्या पैशांची वारेमाप उधळपट्टी केली आहे. एक कोटींची ठेव ठेवून घेताना ३१ मार्चला एक धनादेश स्वीकारला; परंतु हा धनादेश प्रत्यक्षात २४ एप्रिलला वठला. त्यामुळे बँकेला नुकसान झाले. माजी अध्यक्ष चंद्रकांत घाटगे यांनी ३५ हजारांची खोटी बिले सादर करून प्रवास भत्ते उचलले आहेत. संचालक मंडळाने नको त्या कारणांसाठी खरेदी करून वारेमाप पैसे खर्च केले आहेत. पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गैरकारभार करून बॅँकेचे नाव खराब केले आहे.रवींद्र पंदारे व शशिकांत तिवले हे सभेचे खोटे इतिवृत्तांत लिहिण्यात पटाईत आहेत. यासंदर्भात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे, त्यावरूनच त्यांच्या भ्रष्ट कारभाराची प्रचिती येते, असे सांगून माने म्हणाले की, ‘संगणक, स्टेशनरीवर किती खर्च केला याची माहिती मागूनही दिली जात नाही. आपल्या मर्जीतील सहा कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर भरती करून त्यांना वेतनवाढीही दिल्या आहेत. संचालकाच्या एका मेहुण्याची गाडी भाड्याने घेतली आहे. या गाडी वापरावर किती खर्च केला याची माहिती दिली जात नाही.’
संचालकाला घातले कोंडून
माने यांनी सांगितले की, ज्येष्ठ संचालक रंगराव आळवेकर यांनी २०११ मध्ये विद्यमान संचालकांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे पंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीवेळी आळवेकरांना कोंडून घालून, धमकावून राजीनामा लिहून घेतला. बँकेत भ्रष्ट कारभार करणाऱ्यांना राज्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले. त्यांच्या विरोधात लढताना मर्यादा येत होत्या. आता सभासदच अशा लोकांना बाहेर काढतील.
‘गव्हर्न्मेंट सर्व्हंट बॅँक निवडणूक’
‘माझी भूमिका’