गेट तोडून विरोधक सभेत घुसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 01:07 AM2018-10-01T01:07:06+5:302018-10-01T01:07:12+5:30
कोल्हापूर :सकाळी १0 वाजण्यापूर्वीच सभागृह फुल्ल झाले होते; त्यामुळे पोलीस प्रशासनानेच सांगावे आम्ही बसायचे कुठे? आत बोगस सभासद असून, खरे बाहेर आहेत, त्यांना आत सोडा, अन्यथा आम्ही इथेच बसू, असा इशारा देत विरोधी गटाचे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी ‘गोकुळ’ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथील प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला. गेट तोडून सभागृहात प्रवेश केला.
सर्वसाधारण सभा ११ वाजता असल्याने ही वेळ जवळ आल्यावर १०.५५ च्या सुमारास आक्रमक झालेल्या विरोधी गटाच्या नेत्यांसह सभासदांनी गेट ढकलून आत प्रवेश केला, तर बाहेर असलेल्या सभासदांनी तोडफोड करत पत्रे उचकटून रस्त्यावर फेकले व गेटच्या आत असणाऱ्या शॉपीमधील दुधाचे ट्रे बाहेर आणून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या; त्यामुळे गोंधळ निर्माण होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, सभासदांसमोर बोलताना आ. सतेज पाटील यांनी सभागृहात ३६०० लोकांची बसायची व्यवस्था केली असेल तर बहुतांश सभासद बाहेर असताना ते भरलेच कसे, अशी विचारणा केली. सर्वांना हातातील ठराव उंचावून दाखवूया म्हणजे खरे सभासद कळतील.
आ. नरके यांनी आत ३७०० सभासद व बाहेर २००० सभासद असतील तर गोकुळने ५७०० सभासद कधी केले? अशी विचारणा करत बोगस सभासदांना बाहेर काढा व आमच्या २००० हजार सभासदांना आत प्रवेश द्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली. सभेची जागा अपुरी आहे हे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनही त्यांनी जागा बदललेली नाही. ५०-५० बारकोड तयार करून बोगस सभासदांना आत सोडले आहे. असेही त्यांनी सांगितले.
आ. मुश्रीफ यांनी सभागृहातील निम्मी बाजू विरोधी ठरावधारकांसाठी रिकामी करून द्यावी, असे पोलिसांना सांगितले. भाजपच्या आशीर्वादानेच पहाटे पाचला लोक सभागृहात आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रा. संजय मंडलिक यांनी सर्वसाधारण ही हुकूमशाही पद्धतीने असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केला. पोलिसांसमोरच हा प्रकार सुरू आहे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीणसिंह पाटील म्हणाले, स्वत:ची मालकी राहण्यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला जात आहे. नंतर या संचालकांनाही कधी बाहेर काढतील हे समजणार नाही.
राजेंद्र गड्ड्यान्नवार यांनी महाडिक कंपनीकडून दूध संघ घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या लढ्याला विचारपूर्वक पाठिंबा दिला असून, मुश्रीफ-सतेज पाटील यांनी या लढ्याची तड लावावी असेही त्यांनी सांगितले.
‘खरे सभासद बाहेर असताना, आत ही माकडं गेलीच कशी?’ अशी विचारणा करीत पोलिसांनी कोणाचे मीठ खायचे हे ठरवावे; कारण येणारे सरकार हे भाजपचे राहणार नाही, असा टोला गड्यान्नावर यांनी लगावला.
सहा. निबंधक घाणेकरांना पाऊल ठेवू देणार नाही
बोगस सभासद आत बसवून खºया सभासदांना बाहेर ठेवले आहे. त्यामुळे सहायक निबंधक (दुग्ध) गजेंद्र देशमुख व ‘गोकुळ’चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना बाहेर बोलवा, असे सांगितले. बराच वेळ झाला तरी ते बाहेर न आल्याने संतप्त झालेल्या नरके यांनी या दोघांना संघात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला.
चुयेकर यांच्या आत्म्याला काय वाटेल?
प्रवीणसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात मोठे भाऊ रणजितसिंह पाटील व जयश्री पाटील-चुयेकर यांंना सभेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. यावर उपस्थित असलेले आमदार मुश्रीफ व इतर नेत्यांनी ‘आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या आत्म्याला काय वाटेल?’ अशी टिप्पणी केली.
संतप्त सभासदांकडून सभागृहात तोडफोड
पत्रे उचकटले, क्रेट, चप्पलांची फेकाफेकी
दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या
जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमला
२००० सभासद सभेबाहेर असल्याचा विरोधकांचा दावा
हुकूमशाही पद्धतीने सभा चालविल्याचा नेत्यांचा आरोप
समांतर सभेत मल्टिस्टेट नामंजूर