मुहूर्तावरील अक्षय्य खरेदीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:21 AM2021-05-15T04:21:50+5:302021-05-15T04:21:50+5:30
कोल्हापूर : अक्षय्य तृतीया वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध्या मुहूर्ताला केल्या जाणाऱ्या अक्षय्य खरेदीला सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागला. एरवी ...
कोल्हापूर : अक्षय्य तृतीया वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्ध्या मुहूर्ताला केल्या जाणाऱ्या अक्षय्य खरेदीला सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे ब्रेक लागला. एरवी ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारा सराफ बाजार, वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, होम अप्लायन्सेची दुकाने कुलूपबंद होती. एकीकडे कोरोनाची भीती, दुसरीकडे लॉकडाऊन यामुळे नागरिकांनी घरातच आमरस-पुरणपोळी खावून हा दिवस साजरा केला.
वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला घराघरांत आंब्याचे आगमन होते. पुरणपोळी-आमरससारख्या पंचपक्वान्नांचा नैवेद्य देवांना दाखवून सहकुटुंब त्याचा आस्वाद घेतला जातो. या दिवशी घरात शुभकार्य झाले, नवीन वस्तूचे आगमन झाले की कुटुंबात अक्षय समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे यादिवशी प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात नवीन वस्तूंची खरेदी करतात. विशेषत: चोख सोन्यासह दागिन्यांना प्राधान्यक्रम असतो. गेल्यावर्षी या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन होता. आतादेखील कोरोनाची दुसरी लाट सुरू असल्याने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असून सलग दुसऱ्यावर्षी मुहूर्ताच्या दिवशी लहान-मोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.
सराफ बाजारातील ४० कोटींची उलाढाल ठप्प
मुहूर्ताच्या दिवशी सोन्या-चांदीच्या अलंकारांना सर्वाधिक पसंती दिली जाते. शुक्रवारी १० ग्रॅम सोन्याचा दर ४९ हजार २००, तर चांदीचा दर ७१ हजार ५०० किलो असा होता. लग्नसराईचा कालावधी असल्याने विवाहाचे दागिने तसेच चोख सोने, चांदीच्या अलंकारांची खरेदी केली जाते. यंदा गुजरीसह ब्रॅन्डेड दागिन्यांचे शोरूमदेखील बंद होते. यामुळे अंदाजे ४० ते ४५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले.
इलेक्ट्रॅानिक्स वस्तूही शोरूममध्येच
यंदा गुढीपाडव्याला केवळ २० टक्के व्यवसाय झाला, तर अक्षय्य तृतीयेला बाजारपेठ बंद असल्याने सगळ्या वस्तू शोरूममध्ये असून यामुळे शहरात १० कोटींच्यावर उलाढाल थांबल्याची माहिती नॉव्हेल अप्लायन्सेसचे कश्यप शहा यांनी दिली.
वाहन खरेदीही थांबली
अनेक कुटुंबांत दुचाकी व चारचाकी वाहनांचे आगमन होते. आता सर्वसामान्यांनाही हप्ता परवडेल अशा रीतीने कर्जाची जोडणी करून दिली जाते. त्यासाठी शोरूमकडून व फायनान्स कंपन्यांकडून सेवा दिली जाते. यंदा मात्र वाहन खरेदीही थांबली.
--
फोटो स्वतंत्र पाठवला जाईल.