तीन उद्योगांचे वीज-पाणी ४८ तासांत तोडा
By admin | Published: June 11, 2015 01:00 AM2015-06-11T01:00:31+5:302015-06-11T01:06:57+5:30
‘प्रदूषण’ची कारवाई : वीजवितरण कंपनीला आदेश; धावपळ, दबावाचा प्रयोग
कोल्हापूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील कागलजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील इंडोकाऊंट टेक्स्टाईल कंपनी व टेक्स्टाईल पार्कमधील सुदर्शन जीन्स, प्रतिभा दूध प्रकल्प यांचा प्रदूषणप्रश्नी ४८ तासांत वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिला. मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नरसिंग शिवांगी यांनी हा आदेश वीजवितरण कंपनीचे अधिकारी आणि औद्योगिक विकास महामंडळाला दिला आहे. नोटिसीमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ माजली आहे. प्रत्यक्षातील कारवाई टाळण्यासाठी संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची पळापळ सुरू होती.
कागल आणि हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतींमधील काही प्रकल्पांतून औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेविना उघड्यावर सोडल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याचे स्रोत प्रदूषित होत आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पंचगंगा नदी प्रदूषणास औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित पाणीच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियमाप्रमाणे औद्योगिक वसाहतीमधील एकत्रित औद्योगिक सांडपाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असणे आवश्यक आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी शोषून घेण्यासाठी वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात औद्योगिक आणि कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या पाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया होत नाही. पंचगंगा प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी औद्योगिक सांडपाण्याचा प्रश्नही उपस्थित झाला. संपूर्ण औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे जलस्रोत दूषित केल्याप्रकरणी इंडोकाऊंट, सुदर्शन, प्रतिभा दूध प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सर्व औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही. प्रदूषित पाणी उघड्यावर सोेडून जलस्रोत दूषित केल्याप्रकरणी इंडोकांऊट, सुदर्शन, प्रतिभा दूध या प्रकल्पांचा वीज व पाणीपुरवठा ४८ तासांत बंद करण्याचा आदेश दिला आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाप्रमाणे ४८ तासांची मुदत संपल्यानंतर
वीजपुरवठा खंडितची कारवाई केली जाईल.
- दीपक कुमठेकर, अभियंता,
वीज वितरण कंपनी