इचलकरंजीत शिवभोजन थाळीला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:24 AM2021-05-21T04:24:56+5:302021-05-21T04:24:56+5:30
(सुधारित) केंद्र सुरू करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : गरीब, गरजू व निराधार लोकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार ...
(सुधारित) केंद्र सुरू करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : गरीब, गरजू व निराधार लोकांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत होता. त्यांची किमान एक वेळच्या जेवणाची सोय होत होती. मात्र, जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्या गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काही नियम व अटीवर केंद्र सुरु करण्याची मागणी होत आहे.
इचलकरंजी शहरात मोठे तळे, पाटील मळा, डेक्कन रोड व गणेशनगर जवळ अशा चार ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या चार केंद्रांत दररोज एकूण ५६१ लोकांना थाळी दिली जाते. लोकसंख्येच्या प्रमाणात थाळ्यांची संख्या अल्प असली तरी काहीजणांना याचा मोठा आधार मिळत होता. परंतु लॉकडाऊनमुळे शिवभोजन थाळीवर अवलंबून असणाऱ्यांचे खूप हाल होत आहेत.
शहर व परिसरात अनेक सामाजिक संस्था व संघटना मार्फत घरपोच किंवा जागेवर जाऊन जेवण पोहच केले जात आहेत. मात्र, त्यांच्यावर नियमांचे बंधन येत असल्यामुळे काहीजणांपर्यंत पोहचणे शक्य होत नाही. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी व शिवभोजन केंद्र बंद केल्यामुळे थोडी अडचण निर्माण होत आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या उपक्रमांतर्गत लाभार्थींची संख्या वाढवून त्यांनी संबंधितांना जेवण पोहच करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्रतिक्रिया
शहरात कडक लॉकडाऊन असल्यामुळे प्रशासनाच्या आदेशानुसार शिवभोजन थाळी केंद्र बंद केले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणताही आदेश प्राप्त होत नाही, तोपर्यंत केंद्र बंदच ठेवावे लागणार आहे. याचा गरिबांना त्रास सहन करावा लागत आहे.
अरुण साळुंखे, शिवभोजन थाळी केंद्रचालक
शिवभोजन केंद्र बंद असल्यामुळे फिरस्त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. काहीजण रोज केंद्रावर येऊन थोड तरी अन्न द्या, दोन घास तरी मिळू देत, अशी विनवणी करत असतात. अनेक फिरस्ती व गरजू केंद्रावर मिळणाऱ्या जेवणावरच अवलंबून असतात. त्यांचा विचार करता प्रशासनाने निर्णयात थोडाफार बदल करावा.
ज्ञानेश्वर पिसे, शिवभोजन थाळी केंद्रचालक
फोटो ओळी
२००५२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीत लॉकडाऊन जाहीर केल्याने शिवभोजन केंद्र बंद आहे. एका केंद्रावर जेवण मिळेल, या आशेने एक फिरस्ता बसून होता.