वाळव्यातील दहशतवाद मोडून काढा
By admin | Published: February 27, 2017 11:36 PM2017-02-27T23:36:37+5:302017-02-27T23:36:37+5:30
राजू शेट्टी : प्रसंगी कायदा हातात घेण्याचा पोलिस यंत्रणेला इशारा; सांगलीत कार्यकर्त्यांचा विराट मोर्चा
सांगली : वाळव्यात गोळीबार करणाऱ्यांनीच हुतात्मा संकुलाच्या नायकवडी कुटुंबातील सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले असून, काही नेत्यांच्या इशाऱ्यावर वाळव्यात सुरू असलेली दहशत त्वरित मोडीत काढा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पोलिस यंत्रणेला दिला. वाळवा तालुक्यातील पाच हजारावर कार्यकर्त्यांनी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर वाळवा येथे २३ फेब्रुवारी राजकीय वादातून गोळीबार झाला होता. मात्र गोळीबार व हाणामारी करणाऱ्यांनीच वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी व इतर कार्यकर्त्यांवर आष्टा पोलिसांत खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच्या निषेधार्थ वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विराट मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात सांगलीवाडी येथून झाली. मोर्चात खासदार राजू शेट्टी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, नानासाहेब महाडिक, जि. प. सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, डॉ. बाबूराव गुरव, रणधीर नाईक, वैभव पवार, बाळासाहेब नायकवडी, विक्रम पाटील, सुरेखा आडमुठे, नजीर वलांडकर, गौरव नायकवडी, जयराज पाटील, मानसिंग पाटील, शिवाजी पाटील सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी खा. शेट्टी म्हणाले की, आचारसंहिता असताना वाळव्यात उमेदवाराच्या पतीकडे गोळीबारासाठी हत्यार आले कुठून, असा प्रश्न आहे. त्यांनी गोळीबार केला, त्यावेळी पोलिस उपस्थित होते. मात्र तेथे नायकवडी कुटुंबियांपैकी कोणीही नसताना त्रास द्यायचा म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आमचा संयम सुटण्यापूर्वी पोलिसांनी दोषी असणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ‘मास्टरमार्इंड’वरही कारवाई करावी. आम्ही चुकणार नाही, पण कोणी मुद्दाम चुकत असेल, तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही कायदा हातात घेण्यापूर्वी दोषींना अटक करा, अन्यथा आम्हालाही कायदा हातात घ्यावा लागेल.
दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलिस अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडणार आहे, असेही शेट्टी यांनी सांगितले.
वाळव्यात दहशत माजविणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा बदोबस्त त्वरित करा, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अन्य नेत्यांनीही दिला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना निवेदन दिले. (प्रतिनिधी)
...तर शिंगावरही घेणार : शेट्टी
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या विचाराने आम्ही काम करीत आहोत. संयम आणि लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत. आम्ही संयम दाखवतो याचा अर्थ दहशतीला भीत आहोत, असा कोणी समज करून घेऊ नये. कोणी अंगावर आले, तर प्रसंगी त्यांना शिंगावरही घेण्याचे आम्हाला चांगले कळते. नायकवडी कुटुंबीयांच्याच नव्हे, तर एकाही कार्यकर्त्याच्या अंगाला हात लावाल तर याद राखा, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
गोळीबार प्रकरणाची सीआयडी चौकशी करा : वैभव नायकवडी
वाळव्यातील गोळीबार पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीने केला. याला चार पोलिस आणि अधिकारी साक्षीदार आहेत. पण, काही नेत्यांच्या इशाऱ्यामुळे केवळ नायकवडी कुटुंबीयांची बदनामी करण्याच्या हेतूने गोळीबार प्रकरणात किरण नायकवडी, गौरव नायकवडी यांच्यासह पाचजणांवर खोटा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी. गोळीबारातील हत्यार कोठून आले याचा तपास व्हावा. त्यांच्या मास्टरमार्इंडचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वैभव नायकवडी यांनी केली. प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांनीही गोळीबारातील खरा आरोपी मोकाट फिरतोच कसा, असा सवाल केला.