Medha Patkar: देशातील राजकीय अंधश्रद्धा मोडून काढा, मेधा पाटकर यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 01:07 PM2022-04-04T13:07:44+5:302022-04-04T13:08:18+5:30
धर्मांधतेच्या दिशेने गेल्यास देश खड्ड्यात जाईल, विभाजनदेखील होईल अशी चिंता व्यक्त करताना विवेकवादी विचार वाढण्यासाठी अंनिसने आता अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. धर्म आणि धनसत्तेच्या आधारावर देशाची वाताहत होत असल्याच्या या काळात अंनिसने चाैकट भेदून पुढे यायला हवे.
कोल्हापूर : परमेश्वर हावी होत असल्याच्या या काळात मूर्तिपूजक आणि भंजकांच्या माध्यमातून व्होट बॅंक, नोट बँक तयार केली जात आहे. ही देशाला विनाशाच्या खाईत लोटणारी राजकीय अंधश्रद्धा मोडून काढण्याचे सर्वांत मोठे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)ने स्वीकारावे, असे आवाहन नर्मदा बचाव चळवळीच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.
अंनिसतर्फे प्रा. डॉ. एन.डी. पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान प्रारंभ परिषद रविवारी रुईकर कॉलनीतील हिंद को-ऑप. सोसायटीच्या सभागृहात झाला. याच कार्यक्रमात अंनिसच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरोज ऊर्फ माई पाटील यांचा जाहीर सत्कार पाटकर यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी अंनिसच्या विश्वस्थ डॉ. शैला दाभोलकर होत्या.
यावेळी बोलताना पाटकर यांनी हौतात्म्य देऊन जागी ठेवलेली विवेकाची प्रेरणा माईंच्या नेतृत्वाखाली अधिक वेगाने पुढे जाईल अशी अपेक्षा करून देशपातळीवरील धर्मांध वातावरणावर चिंता व्यक्त केली. धर्मांधतेच्या दिशेने गेल्यास देश खड्ड्यात जाईल, विभाजनदेखील होईल अशी चिंता व्यक्त करताना विवेकवादी विचार वाढण्यासाठी अंनिसने आता अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. धर्म आणि धनसत्तेच्या आधारावर देशाची वाताहत होत असल्याच्या या काळात अंनिसने चाैकट भेदून पुढे यायला हवे.
सत्काराला उत्तर देताना सरोज पाटील यांनी अंनिसचे काम करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे, ते सर्वांच्या मदतीने उचलले आहे, यांना सोबत घेऊनच काम करणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाची सुरुवात लहान वयापासूनच करायला हवी असे सांगून त्यापद्धतीनेच काम करणार असल्याचे सांगितले. मेघा पानसरे यांनी येणाऱ्या काळात अंनिसची चौकट अधिक व्यापक होण्यासाठी वाव असल्याने त्यांनी कामाचे कार्यक्षेत्र वाढवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात धोरण निश्चितीत अंनिसने पुढाकार घ्यावा, असेही सुचवले.
दरम्यान, परिषदेच्या निमित्ताने सकाळी उद्घाटन, ‘दुपारी शाळा मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवू शकते’ या विषयावर परिसंवाद झाला. विवेक सावंत यांनी उद्घाटन करताना विवेकाचा जागर सुरूच राहील, असे सांगितले. दुपारचा परिसंवाद सत्रात दीपा पळशीकर, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेतला. अंजली चिपलकट्टी या अध्यक्षस्थानी होत्या. सीमा पाटील, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, सुकुमार मंडपे, प्रा. प.रा. आर्डे, दीपक गिरमे, रमेश वडणगेर, गीता हासूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षपद स्वीकारले; पण खुर्चीवर बसणार नाही
अंनिसच्या राज्याध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची माझी पात्रता नाही, सर्वांनी गळ घातल्यानेच मी ही जबाबदारी स्वीकारली आहे; पण मी कधीही खुर्चीवर बसणार नाही. माझ्या कुवतीप्रमाणे काम करीत राहणार, अशी भूमिका माई ऊर्फ सरोज पाटील यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर जाहीर केली. एन.डी. आणि दाभोलकर या मोठ्या नीतिमान माणसांची ही खुर्ची आहे. विनासायास मिळालेल्या खुर्चीवर बसण्यास संकोच वाटतो अशी भावनाही त्यांनी बोलून दाखविली.
५० हजारांची रक्कम अंनिसकडे सुपुर्द
सत्काराच्या माध्यमातून मिळालेली ५० हजारांची रक्कम माईंनी अंनिसच्या विश्वस्त शैला दाभोलकर यांच्या हाती सुपुर्द केली. शिवाय कार्यक्रम झालेल्या सभागृहाचे भाडेदेखील मीच भरणार आहे, तुम्ही मला अडवायचे नाही, असा प्रेमळ दमही व्यासपीठावरच भरला.